
पुणे : संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष आणि बहुजन समाजाचे नेते प्रवीण गायकवाड यांच्यावर अक्कलकोट येथे रविवारी झालेल्या शाईफेकीच्या भ्याड हल्ल्यामुळे पुण्यात सोमवारी श्री शिवाजी व्यायाम मंडळ येथे झालेल्या निषेध सभेत संभाजी ब्रिगेड आणि विविध पुरोगामी संघटनांनी हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला. या हल्ल्यातील प्रमुख दीपक काटे याच्यावर मकोकाअंतर्गत कारवाई करावी. तसेच राज्य सरकारने जन सुरक्षा विधेयकाचा पहिला आरोपी दिपकला करावे, अशी मागणी मराठा संघटनांच्या बैठकीमध्ये घेण्यात आला.
दरम्यान, संभाजी ब्रिगेडचे नाव कोणत्याही परिस्थितीत बदलले जाणार नाही अशी ठाम भूमिका यावेळी घेण्यात आली. घेतली. या हल्ल्यामागे बहुजनांमध्ये फूट पाडणाऱ्या मनुवादी शक्तींचा हात असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला.
मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड आणि सर्व मराठा समाजाच्या संघटनांच्या वतीने संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावरील हल्ल्याच्या निषेधार्थ बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर, संभाजी ब्रिगेडचे केंदीय निरीक्षक विकास पासलकर, मराठा महासंघाचे अजय पाटील, माजी स्थायी समिति अध्यक्ष श्रीकांत शिरोळे, काँग्रेसचे अरविंद शिंदे, रवींद्र माळवदकर, इतिहास अभ्यासक श्रीमंत कोकाटे, गजानन थरकुडे, प्राची दुधाने, शिवसंग्रामचे तुषार काकडे, रेखा कोंडे, संभाजी ब्रिगेडचे प्रशांत धुमाळ, विराज तावरे, अजय भोसले, युवराज दिसले, पूजा झोळे, माजी महापौर प्रशांत जगताप, पैगंबर शेख, अनिकेत देशमाने, बाळासाहेब दाभेकर, संतोष शिंदे, संजय मोरे, सत्यशोधक चळवळीचे प्रतिमा परदेशी यांसह विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.
हल्लेखोर दीपक काटे आणि त्यांच्या 'शिवधर्म प्रतिष्ठान' या संघटनेने संभाजी ब्रिगेडच्या नावाला आक्षेप घेत, ते 'छत्रपती संभाजी महाराज' असे असावे अशी मागणी करत गायकवाडांवर हल्ला केल्याचा दावा केला आहे. यावर बोलताना निषेध सभेतील कार्यकर्त्यांनी म्हटले की, ज्यांचा इतिहास कच्चा आहे आणि ज्यांनी गुंडगिरी केली आहे, त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांचा इतिहास आम्हाला शिकवण्याची गरज नाही. 'जय भवानी जय शिवाजी' या घोषणेमध्येही भवानी आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचा आदरानेच उल्लेख केला जातो, त्यामुळे 'संभाजी ब्रिगेड' या नावाने कोणताही अवमान होत नाही, उलट ती इथल्या मावळ्यांची भावना आहे, असे स्पष्ट करण्यात आले.
पुरुषोत्तम खेडेकर म्हणाले, काही दिवसापासून मराठा समाजातील संघटनांमधील वातावरण थोडे बिघडले आहे हे सत्य नाकारता येणार नाही. जे झाले ते सकारात्मक पद्धतीने लढले पाहिजे. सर्व संघटना एकत्र येऊन आता पुढे चालू. आपल्यात ही मानापमान सुरू झाले आहे. नागपूरच्या रेशीम भागातून येत आहे हे लक्षात घ्यावे. त्यामुळे याबाबत एकत्र येऊन बैठकीत निर्णय घेऊ. या हल्ल्यामागे 'मनुवादी प्रवृत्ती'चे धोरण असून, बहुजनाला बहुजनाच्या विरोधात लढवण्याचा हा प्रयत्न असल्याचा आरोप रवींद्र माळवतकर यांनी केला. त्यांचे हिंदुत्व हे नथुरामाचे आहे, तुकारामाचे नाही, असेही ते म्हणाले.
हा हल्ला म्हणजे 'एका विशिष्ट कुरूप प्रवृत्तीच्या लोकांनी सत्प्रवृत्तीवर केलेला हल्ला' असल्याचे प्रतिमा परदेशी यांनी नमूद केले. अमित शाह, नरेंद्र मोदी यांसारख्या मोठ्या नेत्यांनीही 'शिवाजी' असा एकेरी उल्लेख केला असताना, त्यांच्यावर जनसुरक्षा कायद्यांतर्गत कारवाई का होत नाही, असा सवाल उपस्थित करत भाजपच्या दुहेरी भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात आले.
भाजपने केलेला हल्ला - जगताप
प्रशांत जगताप म्हणाले, महायुती सरकारचा जाहीर निषेध करतो. दीपक काटे याने नाही तर भाजपाने हा हल्ला केला आहे. दीपक काटे याला सरकारचे पाठबळ मिळत आहे. संबंधित संघटनेवर जनसुरक्षा कायद्यांतर्गत पहिला गुन्हा दाखल करून संघटना बाद करावी. तुम्ही हे करणार नसाल तर मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री यांच्या गाड्या शहरात फिरू देणार नाही.
व्यक्तींवर नाही, तर विचारावर झालेला हल्ला - श्रीमंत कोकाटे
कोकाटे म्हणाले, व्यक्तींवर नाही तर विचारावर झालेला हल्ला आहे. राज्यकर्ते जे आपल्याला गृहीत धरतात त्यांना आपली ताकद दाखवून दिली पाहिजे. विधिमंडळात कोण बोलतोय याची वाट पाहतोय... फक्त कार्यकर्ते वापरून घ्यायचे हा उद्योग सुरू आहे.