
मुंबई/रत्नागिरी : भारतीय हवामान खात्याने यंदा पाऊस लवकर येण्याचे भाकीत वर्तवलेले असतानाच राज्याला मंगळवारी मान्सूनपूर्व सरींनी जोरदार तडाखा दिला. मुंबई व उपनगर, ठाणे, कल्याण, अंबरनाथ, बदलापूर येथे वादळी पाऊस पडला. मराठवाडा, विदर्भासह कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना या अवकाळी पावसाने झोडपले. कोकण रेल्वे मार्गावर विलवडे येथे मंगळवारी सायंकाळी ६ वाजता दरड कोसळल्याने वाहतूक ठप्प झाली होती. ही दरड रात्री हटवून रेल्वे सेवा पूर्ववत करण्यात आली. या पावसामुळे नागरिकांची उकाड्यापासून काहिशी सुटका झाली असून वातावरणात आल्हाददायक गारवा पसरला आहे.
मंगळवारी सायंकाळी राज्याच्या विविध भागात वादळी वाऱ्यासह तुफान पावसाने हजेरी लावली. सकाळपासून मुंबई, उपनगर व ठाण्यातील वातावरण ढगाळ होते. सायंकाळपासून जोरदार पावसाला सुरुवात झाली. रात्री जोरदार पावसामुळे अंधेरीतील भुयारी मार्ग बंद झाला. तसेच वाहने हळूहळू चालवावी लागत होती. पश्चिम आणि पूर्व उपनगरात विजांच्या कडकडाटासह पावसाची सुरुवात झाली. अंधेरी, वर्सोवा, जोगेश्वरी, गोरेगाव येथे वादळी वाऱ्यासह पाऊस पडला. भांडुप, मुलुंड, विक्रोळी, घाटकोपरमध्येही पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या.
लोकल सेवेला फटका
उपनगरात सायंकाळी जोरदार पावसाने हजेरी लावल्याने त्याचा फटका मध्य रेल्वेच्या वाहतुकीला बसला. पूर्व आणि पश्चिम उपनगरात पावसाचा जोर वाढल्याने लोकल धीम्या गतीने सुरू होत्या. मध्य रेल्वेची वाहतूक दहा ते १५ मिनिटे उशिराने सुरू होती.
पुण्यात मुसळधार
पुण्यात शहरातील नगर रस्ता, वडगाव शेरी येथे मुसळधार पाऊस पडला. पावसामुळे वाहतूक कोंडी झाली. पुणे विमानतळावर गळती झालेली पाहायला मिळाली. दुसरीकडे विमानतळावर ड्रेनेजमधील पाणी रस्त्यावर आले. दरम्यान, पुण्याला आज ‘ऑरेंज अलर्ट’ देण्यात आला आहे. पुणे विमानतळावर काल पावसामुळे मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. पुण्यात मंतरवाडी, सणसवाडी येथे होर्डिंग्ज कोसळले, तर फुरसुंगीतील मंतरवाडी चौकातही पावसामुळे फ्लेक्स कोसळले.
सलग पाचव्या दिवशी जालन्यात तुफान पाऊस सुरू असून वादळी वारा व विजा चमकत होत्या. त्यामुळे नागरिकांना घराबाहेर पडणे मुश्कील झाले. सांगली जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली. दुपारपासून जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस पडला. सांगली, मिरज आणि आसपासच्या शहरात दीड तास मुसळधार पाऊस पडला. तर शिराळा, इस्लामपूर यासह अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला. येत्या २४ तासांत पश्चिम किनारपट्टीवर वादळी वारा व विजांच्या कडकडाटासह पावसाचा जोर वाढू शकतो.
आंबा शेतकऱ्यांचे नुकसान
रत्नागिरी हापूस आंब्याचा हा शेवटचा टप्पा सुरू आहे. मात्र, या पावसामुळे शेवटच्या टप्प्यातील २० टक्के आंबा हातचा गेल्याने शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे. मंगळवारी दिवसभर रत्नागिरी, देवरुख, लांजा, राजापूरमध्ये वीज गेली होती. रात्री साडेआठनंतर ती पूर्ववत करण्यास अभियंत्यांना यश आले.
कोकण रेल्वे मार्गावर दरड
रत्नागिरी जिल्ह्यात दुपारी एक वाजल्यापासून धुवाँधार पाऊस पडत असल्याने मंगळवारी सायंकाळी साडेसहा पावणेसातच्या सुमाराला कोकण रेल्वेच्या रुळावर दरड कोसळून रेल्वे सेवा विस्कळीत झाली. ही घटना वेरवली-विलवडे स्टेशनदरम्यान घडली. यामुळे कोकण रेल्वेच्या गाड्या विविध रेल्वे स्थानकांवर थांबवण्यात आल्या होत्या. दरम्यान, रात्री उशिरा कोकण रेल्वेची वाहतूक पूर्ववत झाली.