
मुंबई : भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, येणाऱ्या आठवड्यात पावसाळ्यापूर्वीच्या पावसात वाढ होण्याची शक्यता आहे. मुंबईसह महाराष्ट्रात पुढील आठवडाभर मान्सूनपूर्व पावसाचा जोर कायम राहणार असून, सोमवार वगळता बुधवारपर्यंत यलो अलर्ट आहे.
विभागानुसार, २२ मे रोजी कर्नाटक किनारपट्टीवर अरबी समुद्रात निर्माण होणाऱ्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे सोमवारपासून पुढील रविवारीपर्यंत महाराष्ट्रात पावसाची तीव्रता वाढेल. कोकणातील काही भागांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
शनिवारी मुंबईत आभाळ भरून राहिले होते आणि हवामान उष्ण आणि दमट होते. सकाळी ८ ते ९ या वेळेत शहरात अनेक ठिकाणी १० ते २० मिमी दरम्यान पावसाची नोंद झाली. हवामान विभागानुसार हे वातावरण बुधवारपर्यंत कायम राहणार आहे.
मंगळवारपर्यंत वाऱ्यासह विजांचा कडकडाट व मध्यम पावसाचा इशारा
मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगडच्या काही भागांमध्ये ४०–५० किमी/तास वेगाने वारे, वीज चमकणे आणि हलक्यापासून मध्यम पावसापर्यंत हवामान राहणार आहे. मात्र, सोमवारी मुंबई आणि पालघरमध्ये यलोऐवजी ग्रीन अलर्ट देण्यात आला आहे. म्हणजेच सौम्य पावसाची शक्यता आहे. दक्षिण भारतात यंदा मान्सून अपेक्षेपेक्षा लवकर पोहोचत असून, त्याचा प्रभाव महाराष्ट्रावरही जाणवणार असल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे. मुंबईसह महाराष्ट्रात पुढील आठवडाभर मान्सूनपूर्व पावसाचा जोर कायम राहणार आहे. मुसळधार पावसाचा इशारा असून तापमान व आर्द्रतेमुळे उकाडाही कायम राहणार आहे.
मुंबईतील पावसाची विभागनिहाय नोंद :
नायर रुग्णालय (दक्षिण मुंबई) : १४ मिमी
कुर्ला व पवई (पूर्व उपनगर) : १२ मिमी
खार पश्चिम : २० मिमी (सर्वाधिक)
बांद्रा पश्चिम : १८ मिमी, l जोगेश्वरी : १६ मिमी
बीकेसी : १४ मिमी l मरोळ : १३ मिमी
आरे कॉलनी (गोरेगाव) : ११ मिमी
शनिवारी सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या २४ तासांत, फक्त कुलाबा केंद्रावर ८ मिमी पावसाची नोंद झाली, तर सांताक्रुझमध्ये केवळ थोड्याशा पावसाची नोंद झाली.
उष्णतेपासून दिलासा नाही :
सांताक्रुझमध्ये कमाल तापमान - ३४.४°C (०.७°C अधिक)
कुलाबामध्ये कमाल तापमान ३४.२°C (०.२°C अधिक)
सांताक्रुझमध्ये किमान तापमान २७.९°C (०.८°C अधिक)
कुलाबामध्ये २६.२°C (१.२°C ने कमी) नोंदवले गेले