
मुंबई : शिक्षण हा प्रत्येक मुलाचा अधिकार असून शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी आता ३ ते ६ वयोगटातील मुलांना शाळांमध्ये प्रवेश मिळणार आहे. राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० ची टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी करण्यात येणार असून यासाठी प्री स्कूल रजिस्ट्रेशन पोर्टल सुरू करण्यात येणार आहे.
महिला व बाल विकास विभागाकडून चालवल्या जाणाऱ्या अंगणवाडी, बालवाडी याबाबतची माहिती शासनाकडे उपलब्ध आहे. पूर्व प्राथमिक शिक्षण देणाऱ्या खासगी शाळा, संस्था यावर नियंत्रण नाही. अशा शाळांची आणि शिक्षण व्यवस्थेची माहिती उपलब्ध असावी यादृष्टीने आता शिक्षण विभागाच्या संकेतस्थळावर खासगीरित्या चालवल्या जाणाऱ्या पूर्व प्राथमिक वर्गाच्या माहितीची नोंद करण्याची सुविधा उपलब्ध करण्यात येत आहे. तसेच वयोगट ३ ते ६ साठी शिक्षण देणाऱ्या खासगी केंद्रांची नोंदणी करण्यासाठी प्री स्कूल रजिस्ट्रेशन पोर्टल सुरू करण्यात येत आहे.
या माहितीचा समावेश
पूर्व प्राथमिक वर्गाचे नाव, संपूर्ण पत्ता, व्यवस्थापनाची सविस्तर माहिती, पूर्व प्राथमिक वर्गातील/बाल वाटिकामधील मुले व मुलींची संख्या, पूर्व प्राथमिक वर्गातील भौतिक सुविधा, पूर्व प्राथमिक वर्गासाठी अध्यापन करणारे व मदतनीस अशा कर्मचाऱ्यांची माहिती उपलब्ध होणार आहे.