वाहनांचा पसंती क्रमांक आता घरबसल्या; एका क्रमांकासाठी अधिक अर्ज आल्यास होणार लिलाव

वाहनासाठी पसंती क्रमांक घेऊ इच्छिणाऱ्यांना आता घरबसल्या पसंती क्रमांक मिळणार आहे. पसंती क्रमांकासाठी आरटीओ कार्यालय ही सेवा ऑनलाईन पद्धतीने सुरू करणार आहे. एका क्रमांकासाठी अधिक अर्ज आल्यास लिलाव प्रक्रियेनुसार पसंती क्रमांकाचे वाटप होणार आहे. ही सुविधा आरटीओद्वारे लवकरच राज्यभरात सुरू करण्यात येणार आहे.
वाहनांचा पसंती क्रमांक आता घरबसल्या; एका क्रमांकासाठी अधिक अर्ज आल्यास होणार लिलाव
Published on

मुंबई : वाहनासाठी पसंती क्रमांक घेऊ इच्छिणाऱ्यांना आता घरबसल्या पसंती क्रमांक मिळणार आहे. पसंती क्रमांकासाठी आरटीओ कार्यालय ही सेवा ऑनलाईन पद्धतीने सुरू करणार आहे. एका क्रमांकासाठी अधिक अर्ज आल्यास लिलाव प्रक्रियेनुसार पसंती क्रमांकाचे वाटप होणार आहे. ही सुविधा आरटीओद्वारे लवकरच राज्यभरात सुरू करण्यात येणार आहे.

राज्यात हौशी वाहनचालक मोठ्या प्रमाणात असून नवीन वाहन येताच ते खरेदी करणारे अनेक लोक आहेत. या वाहनासाठी 'व्हीआयपी', पसंतीचा किंवा आकर्षक वाहन क्रमांक असावा अशी इच्छा हौशी नागरिकांची असते. यासाठी हवी ती रक्कम भरण्याची तयारी देखील काही नागरिकांची असते. त्यामुळे राज्य सरकारने सप्टेंबर २०२४ मध्ये अधिसूचना जारी करून 'व्हीआयपी' वाहन क्रमांकांच्या किमतीत वाढ केली आहे. यामुळे वाहनधारकांना अधिक रक्कम मोजून पसंतीच्या वाहन क्रमांकासाठी नोंदणी करावी लागत आहे. त्यामुळे पसंतीचा वाहन क्रमांक खरेदीच्या संख्येत गेल्यावर्षीच्या तुलनेत घट झाली असली तरी उत्पन्नात वाढ झाली आहे. वाहनमालकांना घर बसल्या वाहन नोंदणी करता यावी यासाठी २५ नोव्हेंबरपासून ऑनलाईन सेवा सुरू केली आहे.

पिंपरी-चिंचवड आरटीओ कार्यालयात वाहन क्रमांकाची मालिका आणि परिवहन संकेतस्थळाचे सॉफ्टवेअर जोडणीचे काम झाल्यानंतर प्रायोगिक तत्त्वावर ही सेवा सुरू करण्यात आली आहे. पिंपरी-चिंचवड येथे यशस्वीरीत्या चाचणी प्रक्रिया पार पडल्याने आता राज्यभरात ही सेवा कार्यान्वित केली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. या सुविधेमुळे आता अनेकांना आपल्या वाहनासाठी पसंतीचा क्रमांक घरबसल्या मिळणार आहे.

लिलावाची कार्यपद्धत पूर्वीप्रमाणे ऑफलाईन

यापूर्वी नवीन वाहन क्रमाकांच्या मालिकेची जाहिरात आरटीओकडून प्रसिद्ध झाल्यानंतर वाहनधारकाला आरटीओ कार्यालयात येऊन प्रक्रिया करावी लागत होती. मात्र आता नवीन वाहन क्रमाकांची मालिका सुरू झाल्यानंतर वाहनधारकांना ऑनलाईन पैसे भरता येणार आहेत. यासह एकाच वाहन क्रमांकासाठी एकापेक्षा जास्त अर्ज आल्यास आरटीओ कार्यालयात लिलाव प्रक्रिया राबविण्यात येईल. जो व्यक्ती अधिक बोली लावेल त्याला तो क्रमांक दिला जातो. तर, सद्यस्थितीत नवीन मालिका सुरू केल्यानंतर होणारी नोंदणी क्रमांक आरक्षित करण्यासाठी लिलावाची कार्यपद्धत पूर्वीप्रमाणे ऑफलाईन पद्धतीने सुरू राहील, असे परिवहन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांने सांगितले.

logo
marathi.freepressjournal.in