मुंबई : देशभर रिपब्लिकन पक्ष वाढत आहे. रिपब्लिकन पक्षात दलितांसोबत सर्व जातीधर्माचे लोक मोठ्या प्रमाणात जोडले जात आहेत. ईशान्य भारतात रिपब्लिकन पक्षाची ताकद वाढली आहे. महाराष्ट्रात संघटनात्मक बांधणी करून लोकांना जोडून पक्षाचे बळ वाढवावे लागेल. त्यानंतर स्वबळाची भाषा करावी लागेल, असे प्रतिपादन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले.
मुंबई प्रदेश रिपब्लिकन पक्षातर्फे आठवले यांचा सत्कार सोहळा षण्मुखानंद सभागृह येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी भाजप प्रवक्ते आमदार प्रवीण दरेकर, रासपचे माजी मंत्री महादेव जानकर, सीमा आठवले, अध्यक्ष स्थानी रिपाइंचे मुंबई अध्यक्ष सिद्धार्थ कासारे, माजी मंत्री अविनाश महातेकर, रिपाइंचे महाराष्ट्र अध्यक्ष राजा सरवदे, राज्य सरचिटणीस गौतम सोनवणे यावेळी उपस्थित होते.