
मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी महायुती व महाविकास आघाडीमध्ये जोरदार चुरस आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर मविआने जोरदार आवाज उठवायला सुरुवात केली आहे. राज्यात मविआचे सरकार स्थापन झाल्यास सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना प्रति क्विंटल ७ हजार रुपये भाव दिला जाईल, अशी घोषणा लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी ‘एक्स’वर ट्विट करून केली आहे.
विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी सत्तेत येताच सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना क्विंटलला ७ हजार रुपये दर देण्याचा पहिला निर्णय घेतला जाईल. मविआ सरकारचा हा ऐतिहासिक निर्णय असेल, असे गांधी यांनी स्पष्ट केले आहे.
राज्यातील सोयाबीन, कांदा, कापूस उत्पादक शेतकरी अडचणीत आले आहेत. गेल्या तीन निवडणुकांत सोयाबीन उत्पादकांना सहा हजार रुपये भाव दिला जाईल, असे भाजपने सांगितले. मात्र आजही सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना तीन ते चार हजार रुपये दर मिळण्यासाठी झगडावे लागते. भाजप सरकारकडून शेतकऱ्यांना फक्त आश्वासन दिले जाते. प्रत्यक्षात काहीच देत नाही, असा हल्लाबोल राहुल गांधी यांनी भाजपवर केला आहे.
राज्यात विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत येताच सोयाबीन कापूस उत्पादक कांदा उत्पादक शेतकऱ्यांना योग्य तो भाव देईल, असा विश्वास त्यांनी एक्सवर ट्विट करत व्यक्त केला आहे.