पंतप्रधानांनी राहुल गांधींच्या 'भारत जोडो'चा धसका घेतलाय, म्हणून ते वारंवार... : संजय राऊत

हा राहुल गांधींच्या भारत जोडो न्याय यात्रेचा घेतलेला धसका आहे, त्यामुळेच ते वारंवार महाराष्ट्रात येत आहेत, अशी टीका त्यांनी केली.
पंतप्रधानांनी राहुल गांधींच्या 'भारत जोडो'चा धसका घेतलाय, म्हणून ते वारंवार... : संजय राऊत

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज सोलापूर दौऱ्यावर आहेत, त्यांनी आज सोलापुरमधील विविध विकास प्रकल्प आणि उपक्रमांचे उद्घाटन केले. गेल्या आठ दिवसांतच पंतप्रधानांचा महाराष्ट्राचा हा दुसरा दौरा आहे. त्यावरून शिवसेना ( उद्धव ठाकरे गटाचे) खासदार संजय राऊत यांनी निशाणा साधला आहे. हा राहुल गांधींच्या भारत जोडो न्याय यात्रेचा घेतलेला धसका आहे, त्यामुळेच ते वारंवार महाराष्ट्रात येत आहेत, अशी टीका त्यांनी केली. यावेळी राऊत यांनी आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांच्या या दौऱ्याचा संबंध जोडला आणि मोदींच्या 13 महिन्यांत महाराष्ट्राच्या अनेक भेटींवर प्रश्न उपस्थित केले.

महाराष्ट्रावर प्रेम नाही, तर...-

"पंतप्रधान नरेंद्र मोदी हे वारंवार महाराष्ट्रात येत आहेत. त्यांना महाराष्ट्रावर तितकं प्रेम आहे असं नाही किंवा ते उत्तर प्रदेशला जात आहेत म्हणून ते उत्तर प्रदेशवर प्रेम करतात असं नाही. उत्तर प्रदेशच्या लोकसभेच्या जागा जास्त आहेत. महाराष्ट्रतही लोकसभेच्या जागा जास्त आहेत," असे राऊत यांनी आज मुंबईत पत्रकारांशी बोलताना सांगितले.

शिंदे, फडणवीस, पवारांच्या मागे मतदार नाहीत -

"राहुल गांधींच्या भारत जोडो न्याय यात्रेचा घेतलेला हा धसका आहे. म्हणून 48 जागांवर पुन्हा एकदा मोदीच प्रचार करतील. मुख्यमंत्री शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्या मागे मतदार नाहीत, हे मोदींना समजलंय त्यामूळे त्यांना वारंवार महाराष्ट्रात यावं लागत आहे", असे राऊत म्हणाले.

जिथे राजकीय फायदा तिथेच पंतप्रधान-

पुढे बोलताना, "प्रधानमंत्री जिथे त्यांना राजकिय फायदा आहे. तिथेच जातात. मणिपूरमध्ये जर लोकसभेच्या 25 जागा असत्या तर ते मणिपूरला जाऊन थांबले असते. मणिपूरला लोकसभेच्या 2 किंवा 3 जागा आहेत, त्यामूळे त्यांना राजकीयदृष्टा मणिपूर महत्वाचं नाही. प्रधानमंत्री आणि त्यांचा पक्ष हा फक्त लोकसभेच्या आकड्यांचा हिशेब करतो आणि राजकारण करतो", अशी टीकाही त्यांनी पंतप्रधानांसह भाजपवर केली.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in