युवकांमुळे देश आर्थिक महासत्तेकडे; पंतप्रधान नरेंद्र मोदी: नाशिक येथे राष्ट्रीय युवा महोत्सवाचे उद्घाटन

राष्ट्रीय युवा महोत्सवाचे औचित्य साधत नाशिक दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हजारो नाशिककरांनी रस्त्याच्या दुतर्फा उभे राहून उत्स्फूर्त स्वागत केले.
युवकांमुळे देश आर्थिक महासत्तेकडे; पंतप्रधान नरेंद्र मोदी: नाशिक येथे राष्ट्रीय युवा महोत्सवाचे उद्घाटन

हारून शेख/नाशिक : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत काळातील आजची तरुण पिढी नशीबवान आहे. या पिढीला वेगवेगळ्या संधी उपलब्ध आहेत. या पिढीला सामर्थ्यवान आणि कौशल्याधारित करण्यासाठी सरकारच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. या युवकांच्या सामर्थ्यावरच भारताची जागतिक आर्थिक महासत्ता होण्याकडे वाटचाल सुरू आहे. अमृत काळातील पुढील २५ वर्षांच्या कालावधीत परिश्रम घेत तरुणांनी २०४७ पर्यंत विकसित भारत घडवित इतिहास निर्माण करावा, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी येथे केले.

केंद्रीय युवक कल्याण व क्रीडा विभाग आणि राज्य शासनातर्फे नाशिक येथे शुक्रवारपासून सुरू झालेल्या २७ व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचे उद‌्घाटन मोदी यांच्या हस्ते दुपारी तपोवन मैदानावर झाले. यावेळी व्यासपीठावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर, निसिथ प्रामाणिक, डॉ. भारती पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, राज्याचे मंत्री छगन भुजबळ, दादाजी भुसे, राधाकृष्ण विखे पाटील, गिरीश महाजन, संजय बनसोडे, विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, खासदार डॉ. सुभाष भामरे, हेमंत गोडसे, आमदार चंद्रशेखर बावनकुळे, नरेंद्र दराडे, किशोर दराडे, माणिकराव कोकाटे, दिलीप बोरसे, दिलीप बनकर, प्रा. देवयानी फरांदे, सरोज अहिरे, डॉ. राहुल आहेर, सीमा हिरे, नितीन पवार, ॲड. राहुल ढिकले उपस्थित होते.

पंतप्रधान मोदी म्हणाले, ‘‘स्वामी विवेकानंद, योगी अरविंद यांनी युवकांची ताकद ओळखली होती. ते युवकांचे प्रेरणास्थान आहेत. भारतीय युवकांचे परिश्रम, सामर्थ्यामुळे भारताची अर्थव्यवस्था जगात पाचव्या क्रमांकावर पोहोचली आहे. याच शक्तीच्या सामर्थ्यावर भारताची आर्थिक महासत्तेकडे वाटचाल सुरू आहे. याच युवकांच्या बळावर भारत मॅन्युफॅक्चरिंगचे हब म्हणून पुढे येत आहे. यातूनच तरुणांना इतिहास घडविण्याची संधी मिळणार आहे. स्वातंत्र्यापूर्वीच्या पिढीने देशासाठी जीवन अर्पण केले. आताच्या पिढीने पुढील २५ वर्षांचा काळ कर्तव्य काळ मानत विकसित भारताच्या निर्मितीसाठी द्यावा, त्यासाठी युवकांनी संकल्प सोडावा. जेणेकरून भारत जगात नव्या उंचीपर्यंत पोहोचू शकेल. त्यासाठी मेरा भारत- युवा भारत संघटन सुरू करण्यात आले आहे.’’

पंतप्रधान मोदी म्हणाले, ‘‘आधुनिक भारत घडविण्यासाठी तरुणांच्या मार्गात येणारे विविध अडथळे दूर करण्यात येत आहे. कौशल्‍य विकासावर आधारित राष्ट्रीय शिक्षण धोरण अंमलात येत आहे. त्यातून रोजगार निर्मितीला चालना मिळणार आहे. आयआयटी, एनआयटी महाविद्यालये सुरू करण्यात येत आहेत. युवकांमधील कौशल्य विकासासाठी पाश्चात्य देशांबरोबर सामंजस्य करार करण्यात आले असून त्यांचाही लाभ होत आहे. गेल्या दहा वर्षांत केंद्र सरकारने युवकांना नवनवीन संधी दिल्या आहेत. युवकांनी आता राजकारणात येऊन लोकशाही व्यवस्था बळकट करावी,’’ असे आवाहनही पंतप्रधान मोदी यांनी केले.

राजमाता जिजाऊ यांची आज जयंती. राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या उद्घाटनानिमित्त पंतप्रधान मोदी यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते राजमाता जिजाऊ यांच्या पुतळ्याचे पूजन करण्यात आले. हाच धागा पकडत मोदी म्हणाले, ‘‘भारतीय नारी शक्तीचे प्रतीक राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त वंदन करण्यासाठी महाराष्ट्राच्या वीरभूमीत येण्याची संधी युवा महोत्सवामुळे मिळाली, याचा अतिशय आनंद होत आहे.

पंतप्रधानांचा नाशकात ‘रोड शो’

राष्ट्रीय युवा महोत्सवाचे औचित्य साधत नाशिक दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हजारो नाशिककरांनी रस्त्याच्या दुतर्फा उभे राहून उत्स्फूर्त स्वागत केले. पंतप्रधान मोदी यांच्या नाशिक येथील आगमनाने उल्हसित झालेल्या नागरिकांनी स्वागताचे फलक हाती घेत 'भारत माता की जय'चा जयघोष करत आसमंत दुमदुमून टाकला. मोदी यांच्या या 'रोड शो'ची जादू नाशिककरांवर झाल्याचे चित्र शुक्रवारी सगळीकडे पाहायला मिळाले. सकाळी ठीक १०-३० वाजता पंतप्रधान मोदी यांचे निलगिरी बाग हेलिपॅड येथे आगमन झाले. त्यानंतर हॉटेल मिर्ची चौकातून केशरी रंगाच्या आणि फुलांनी सजवलेल्या खुल्या जीपमधून त्यांच्या 'रोड शो'ला प्रारंभ झाला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, चंद्रशेखर बावनकुळे त्यांच्यासमवेत होते.

logo
marathi.freepressjournal.in