"हा तर परमात्म्याचा प्रसाद, एक थेंबही पाणी वाया घालवू नका", पंतप्रधान नरेंद्र मोदींची शेतकऱ्यांना विनंती

यावेळी सभेला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणाची सुरुवात मराठीतून केली.
"हा तर परमात्म्याचा प्रसाद, एक थेंबही पाणी वाया घालवू नका", पंतप्रधान नरेंद्र मोदींची शेतकऱ्यांना विनंती

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज शिर्डी दौऱ्यावर होते. या दौऱ्यात केलेल्या भाषणाची सुरुवात त्यांनी मराठीतून केली. सर्वात आधी त्यांनी शिर्डीच्या प्रवित्र भूमीला कोटी कोटी प्रणाम असं म्हणत निळवंडे धरणाचं पाच दशकांपासून अडकलेलं काम आज पूर्ण झाल्याचं सांगितलं. यावेळी मोदींनी ज्येष्ठ किर्तनकार बाबा महाराज सातारकर यांच्या निधनाचा उल्लेख करून त्यांना श्रद्धांजली वाहिली.

नरेंद्र मोदी पुढं म्हणाले, संपूर्ण महराष्ट्रात आज शेतकऱ्यांच्या नावावर मतांचं राजकारण करणाऱ्यांनी आपल्याला थेंब थेंब पाण्यासाठी वेठीला धरलं. आज निळवंडे धरण प्रकल्पाचं जलपुजन संपूर्ण झालं. या प्रकल्पाला १९७० मध्ये स्विकृती मिळाली. त्यानंतर पाच दशकं ही योजना अशीच लटकून राहिली होती. पण जेव्हापासून आमचं सरकार आले तेव्हापासून या कामाला वेगानं सुरुवात झाली. आता डाव्या कालव्यातून लोकांना पाणी मिळणं सुरु झालं आहे. लवकरच उजव्या कालव्यातून पाणी मिळेल.

राज्यातील जे दुष्काळग्रस्त भागात राहतात त्या लोकांना आणि शेतकऱ्यांसाठी बळीराजा जलसंजीवनी योजना देखील वरदान सिद्ध झाली आहे. अनेक दशकांपासून अडकलेले महाराष्ट्रतील आणखी ३६ सिंचन योजना केंद्र सरकार पूर्ण करणार आहे. याचा खूप मोठा लाभ आपल्या शेतकऱ्यांना, दुष्काळग्रस्त भागांना होईल.

आता या धरणातून पाणी मिळणं सुरु झालं आहे. तर माझी सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे की, हा परमात्म्याचा प्रसाद आहे. त्यामुळं यातील एक थेंबही पाणी वाया घालवू नका. 'पर ड्रॉप मोअर क्रॉप' याअंतर्गत जेवढी पण अत्याधुनिक तंत्रज्ञान आहे त्याचा आपण वापर केला पाहजे, असं आवाहनही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यांनी केलं.

logo
marathi.freepressjournal.in