

भास्कर जामकर/नांदेड
धान्य वितरणात पारदर्शकता यावी, काळ्या बाजाराला चाप बसण्याकरिता शासनाने रेशन घेणाऱ्या लाभार्थींना ई-केवायसी बंधनकारक करण्यात आले आहे. परंतु, केवायसी करण्यासाठी गेलेल्या वयोवृद्ध तसेच मजूर वर्गातील लाभार्थींचे ठसे पॉस मशीनवर लागत नसल्याने त्यांच्यावर हेलपाटे मारण्याची वेळ आली आहे. ज्या लाभार्थ्यांनी ई-केवायसी केली नाही त्या लाभार्थ्यांचे रेशन बंद होणार आहे. त्यामुळे रेशनवरील धान्य बंद होण्याच्या भीतीने रेशन कार्डधारक दुकानात सकाळपासून चकरा मारत असल्याचे नांदेड जिल्ह्यात सर्वत्र चित्र आहे.
दरम्यान, ५ नोव्हेंबरपर्यंत जिल्ह्यात २३ लाख ४ हजार ४०१ लाभार्थ्यांपैकी केवळ २ लाख २६ हजार ६९६ (५ टक्के) लाभार्थीची ई-केवायसी पूर्ण झाली आहे. २१ लाख ७७ हजार ७०५ लाभार्थीची ई-केवायसी पूर्ण करण्याचे आव्हान पुरवठा विभागासमोर आहे.
सरकारची खाद्य सुरक्षा योजना पारदर्शकरित्या राबविण्यासाठी कार्डधारकांना जिल्ह्यातील सर्वच रेशन दुकानांमध्ये जाऊन केवायसी करायची आहे. केवायसी न करणाऱ्यांचे नाव खाद्य सुरक्षा यादीतून वगळण्यात येणार आहे. केवायसीकरिता कार्डावर नमूद ग्राहकांना कागदपत्रे देण्याची गरज नाही. मात्र, या सर्वांना रेशन दुकानातील बायोमेट्रिक मशीनवर अंगठा लावून केवायसी करायचे आहे. तसेच नवीन ई-पॉस मशिनमध्ये बुबुळाद्वारे लाभार्थीची पडताळणी करण्यात येत आहे. परंतु, केवायसी करण्यासाठी गेलेल्या वयोवृद्ध तसेच मजूर वर्गातील लाभार्थींचे ठसे पॉस मशीनवर लागत नसल्याने त्यांना हेलपाटे मारण्याची वेळी आली आहे. तिथे त्यांना तास न तास उभे राहावे लागत आहे.
विशेष म्हणून कार्डधारक असलेल्या संपूर्ण कुटुंबालाच केवायसीची सक्ती करण्यात आल्याने अनेक वृद्ध, दिव्यांगे, रुग्ण, लहान मुले, महिलांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. रेशन दुकानदारांकडील मशीन अनेकदा सर्व्हर डाऊनमुळे बंद पडतात. आधार लिंक करताना बोटांचे ठसे घेणे आवश्यक आहे. मात्र, वृद्धांसह मजूर वर्गाचे ठसे घेतांना अडचणी उद्भवत आहे. प्राप्त आय स्कॅनिंग मशीनही नेटवर्कमुळे बंद-चालू होत असल्याने लाभार्थींनाही मन:स्ताप सहन करावा लागत आहे. कष्टाच्या कामाने बोटांवरील रेषा पुसट होतात. विशेषतः कष्टाची कामे करणारे, धुणीभांडी करणाऱ्या महिला, वयोवृद्धांना ही समस्या जाणवत आहे.
'आधार' जमा नसलेले लाभार्थी
भोकर ००, मुदखेड १, उमरी ६, कंधार १९, माहूर १६७, बिलोली ३२६, लोहा ५८१, देगलूर ८९८, धर्माबाद १०१०, अर्धापूर १४७३, हिमायतनगर १५८०, नायगाव १७८९, किनवट ३०८४, मुखेड ३७०९, हदगाव १०६५८, नांदेड ११६२१ असे एकूण ३६ हजार ९२२ लाभार्थींनी स्वस्त धान्य दुकानात आधारच जमा केले नाहीत.
केवायसी राहिलेले लाभार्थी
अर्धापूर ६२९१३, भोकर ८२७५४, बिलोली ११०९५०, देगलूर १३९०२६, धर्माबाद ५२०७०, हदगाव १७७८४६, हिमायतनगर ८८८६४, कंधार २०१६६८, किनवट १५७१५१, लोहा १९३६१७, माहूर ७४९९७, मुदखेड ७६५७८, मुखेड २०२०९५, नायगाव १४३६३२, नांदेड ३५६९०४, उमरी ५६६४० असे एकूण २१ लाख ७७ हजार ७०५ लाभार्थ्यांचे केवायसी होणे बाकी आहे.
केवायसी हे बंधनकारक असून, यामुळे बोगस लाभार्थी निघून जातील. तसेच लाभार्थ्यांनी ई-केवायसी करताना आपला मोबाईल क्रमांकही देण्यात यावा. ज्यामुळे त्यांना धान्याचा संदेश येईल. वयोवृद्ध नागरिकांसह कष्टकऱ्यांचे ठसे उमटत नाहीत, अशी अडचण येत असेल तर, यासाठी पर्याय देण्यात आले आहेत. ओटीपी, थंब, आय स्कॅनिंग या तीन पर्यायाशिवाय तहसील कार्यालयात जाऊन लाभार्थींना आधार अपडेट करून ई-केवायसी पूर्ण करून घेता येईल.
रूपाली चौगुले, जिल्हा पुरवठा अधिकारी