काल रात्री पुणे बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर तासवड टोलनाक्याजवळ एका खासगी आराम बसला रात्री तिनच्या सुमारास अचानक भीषण आग लागलीय. या आगीत बस पूर्णतः जळून खाक झाली आहे. सुदैवाने या आगीतून ५५ प्रवाशी बचावले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, ही आराम बस डॉल्फिन कंपनीची होती. ही बस सुमारे ५५ प्रवाशांना घेऊन मिरजेहून मुंबईकडे जात असताना कराड-तासवड भागात ही दुर्घटना घडली. या बसला आग ही पाठून लागल्यामुळे लगेच या आगीने भीषण रूप घेतले होते.
बसला आग लागल्याचे पाहून महामार्गावरून जाणाऱ्या बाकीच्या वाहनातील लोकांनी ही माहिती ताबोडतोब तासवडे टोलनाक्यावरील कर्मचाऱ्यांना दिली. लगेचच टोलनाका व्यवस्थापनाने मदतीसाठी आपल्या कर्मचाऱ्यांसह घटनास्थळाकडे धाव घेतली. महामार्ग व्यवस्थापनाचे गस्त घालणारे पथक, तळबीड पोलीस लगेच दाखल झाले. बस मधील सगळ्या प्रवाश्यांना सुखरूप बाहेर काढण्यात आले होते. आगीला पाहून प्रवाशांमध्ये प्रचंड गोंधळ निर्माण झाला होता.
दरम्यान, जवळच्या आग्निशामक दलाशी संपर्क झाल्याने पाणी बंब व आग्निशामक पथकही तिथं दाखल झाले होते. त्यांनी ही आग बसच्या डिझेल टाकीपर्यंत पोहचू दिली नाही. त्यामुळे या टाकीचा स्फोट झाला नाही आणि सुदैवाने आणखी हानी होण्यापासून टळली. या घटनेत कुठलीही जीवितहानी झाली नाही. मात्र वाहनाचे लाखोंचे नुकसान झाल्याचे स्पष्ट दिसत आहे.