आगामी लोकसभा निवडणुकीसंदर्भात सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. अशात काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी या महाराष्ट्रातून लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचं बोललं जात आहे. प्रियंका यांचे राजकीय सल्लागार आचार्च प्रमोद कृष्णम यांनी देखील एका मुलाखतीत ही माहिती दिली आहे. त्यांच्या या दाव्यानंतर राज्यातील काँग्रेसमध्ये मोठ्या हालचाली सुरु झाल्या आहेत.
यावर राज्यातील काँग्रेसच सक्षण महिला नेतृत्व असलेल्या माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी देखील आपली प्रतिक्रिया दिली आहे. माध्यम प्रतिनिधींशी बोलताना त्या म्हणाल्या की, जर प्रियंका गांधी महाराष्ट्रात लोकसभेची निवडणूक लढवणार असतील तर ही सर्वात चांगली गोष्ट आहे. आम्ही त्यांचं स्वागत करतो. अमरावती मतदार संघ हा अनुसूचित जातीसाठी राखीव आहे. म्हणून अडचण आहे. अन्यथा, प्रियंका गांधी यांना येथूनच लढण्याचा आग्रह केला असता. असा ठाकूर म्हणाल्या.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मंगळवारी यशोमती ठाकूर यांच्या निवास्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. त्यासंदर्भात विचारलं असता, यशोमती ठाकूर म्हणाल्या की, २०२४ ची निवडणूक आम्ही महाविकास आघाडी म्हणून एकत्रितपणे लढविण्याची तयारी केली आहे. सध्या सुप्रिया सुळे या विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. त्यांचा हा दौरा महाविकास आघाडीला उभारी देणारा ठरणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.