मुंबई : राज्यातील प्रकल्प गुजरातला पळविले जात असल्याचा मुद्दा निवडणूक प्रचारात आधीच महत्त्वाचा बनलेला आहे. त्यातच आता राज्यातील निवडणूक प्रचार साहित्य विक्री करणाऱ्या विक्रेत्यांनाही या गुजरात कनेक्श्नचा फटका बसत असल्याचे समोर आले आहे. स्थानिक किरकोळ विक्रेत्यांकडून प्रचार साहित्याची खरेदी करण्याऐवजी राजकीय पक्ष थेट गुजरातमधील घाऊक विक्रेत्यांकडूनच प्रचार साहित्य खरेदी करत असल्यामुळे राज्यातल्या विक्रेत्यांना मोठी आर्थिक झळ सोसावी लागत आहे.
निवडणुकांमध्ये झंडे, टोप्या, स्कार्फ, फेटे आदी प्रचार साहित्याची मोठी मागणी असते. या काळातच प्रचार साहित्य बनवणारे लहान उद्योग व विक्रेते यांचा व्यवसाय तेजीत असतो. मात्र यंदा विविध राजकीय पक्षांनी थेट गुजरातमधील होलसेल विक्रेत्यांनाच मोठ्या ऑर्डर्स देऊन प्रचार साहित्य खरेदी करण्यास सुरुवात केली आहे, असे लालबाग येथील दुकानदार योगेश पारेख यांनी सांगितले. त्यांचे पारेख ब्रदर्स या नावाने लालबाग येथे निवडणूक प्रचार साहित्य विक्रीचे दुकान असून गेली ७५ वर्षे ते या व्यवसायात आहेत.
मागणी व विक्री दोन्ही कमी झाल्यामुळे दुकानदारांना दुहेरी फटका बसत असल्याचे नॅशनल ड्रेसवाला दुकानाचे मालक जैन भाई यांना वाटते. केवळ टिकून राहण्यासाठी माल कमी किमतीत विकावा लागत आहे. प्रचार साहित्याची विक्री ही केवळ निवडणुकीच्या काळात होते असते. त्यामुळे तगून राहण्यासाठी दुसरा पर्याय म्हणून दुकानदारांनी आता फॅन्सी ड्रेसेस, ज्चेलरी भाड्याने देण्याचा व्यवसाय सुरू केला आहे, असे जैन यांनी सांगितले.
आम्हीदेखील फॅन्सी ज्वेलरी आणि डेकोरेशनच्या व्यवसाय सुरू केला आहे, अशापुरा ड्रेसवालाचे मितेश जोशी यांनी सांगितले.
निवडणुकीच्या काही महिने आधीच गुजरातमधल्या विक्रेत्यांना मोठ्या ऑर्डर्स दिल्या जातात. त्यामुळे महाराष्ट्रातील रिटेल विक्रेत्यांना मिळणाऱ्या आर्डर्स इतक्या कमी झाल्या आहेत की त्यांना व्यवसायात टिकून राहण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. मालाला मागणी नाही म्हणून कमी किमतीतही विक्री करावी लागते.
- योगेश पारेख, पारेख ब्रदर्स