राजधानी दिल्लीत राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक होत आहे. या बैठकीला खुद्द शरद पवारही मार्गदर्शन करणार आहेत. याच बैठकीत शरद पवार यांच्याकडे संयुक्त पुरोगामी आघाडी अर्थात यूपीएचे अध्यक्षपद सोपवण्याचा ठराव मांडण्यात आला आहे.
‘देशातील सध्याची राजकीय स्थिती लक्षात घेता शरद पवार यांनी काँग्रेस आणि इतर प्रादेशिक पक्षांचे राष्ट्रीय पातळीवर नेतृत्व करायला हवे. शरद पवार हे देशातील सध्याचे सर्वात अनुभवी नेते आहेत. संरक्षण मंत्री आणि कृषी मंत्री म्हणून त्यांचे देशाच्या विकासातील योगदान मोठे आहे. या सर्व बाबी विचारात घेत त्यांच्याकडे विरोधी पक्षाचे नेतृत्व सोपवायला हवे’, असे या ठरावात नमूद करण्यात आले आहे. या ठरावावर शरद पवार नेमके काय बोलतात, याची सर्वांनाच आता उत्सुकता असून राष्ट्रवादीच्या गोटातून उघडपणे पवारांना यूपीए अध्यक्षपद देण्याची मागणी पुढे आल्याने राष्ट्रीय राजकारण नवे वळण घेणार हे मात्र निश्चित आहे.