‘भ्रष्टाचाऱ्यांना अभय’ ही मोदी गॅरंटी- उद्धव ठाकरे; भाजपने भ्रष्टाचारी अभय योजना चालवल्याचा आरोप

‘भ्रष्टाचाऱ्यांना अभय’ ही मोदी गॅरंटी- उद्धव ठाकरे; भाजपने भ्रष्टाचारी अभय योजना चालवल्याचा आरोप

पंतप्रधान नरेंद्र मोदी सातत्याने कोणती ना कोणती गॅरंटी देत सुटले आहेत. परंतु ‘भ्रष्टाचाऱ्यांना अभय’ हीच त्यांची खरी गॅरंटी आहे. त्यांनी भ्रष्ट नेत्यांसाठी खास ‘भ्रष्टाचारी अभय योजना’ सुरू केली आहे. कारण...

विशेष प्रतिनिधी/मुंबई

पंतप्रधान नरेंद्र मोदी सातत्याने कोणती ना कोणती गॅरंटी देत सुटले आहेत. परंतु ‘भ्रष्टाचाऱ्यांना अभय’ हीच त्यांची खरी गॅरंटी आहे. त्यांनी भ्रष्ट नेत्यांसाठी खास ‘भ्रष्टाचारी अभय योजना’ सुरू केली आहे. कारण अनेक भ्रष्टाचाऱ्यांना भाजपमध्ये प्रवेश देऊन त्यांना अभय देण्यात आले आहे, अशा शब्दांत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल केला. दरम्यान, मनसेला राम राम ठोकणारे पुण्यातील नेते वसंत मोरे यांनी गुरुवारी शरद पवार यांची भेट घेतली.

रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर येथे आयोजित सभेत गुरुवारी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर खासदार विनायक राऊत, आमदार भास्कर जाधव, माजी जिल्हाप्रमुख सचिन कदम आदी उपस्थित होते. भाजपची असभ्य आणि असंस्कृत भाषा सुरू झाली आहे. रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीमध्ये अशा शिव्या आणि घाणेरडे प्रकार शिकविले जातात का, असा सवाल उपस्थित करीत अशा भाषेला अजिबात उत्तर देऊ नका. भारतीय जनता पक्षाची खरी संस्कृती आता बाहेर आली आहे. अडवाणी, वाजपेयी यांच्यासारखे नेते होते, त्यावेळी भाजपमध्ये संस्कृती होती. पण आताच्या भाजपला संस्कृती म्हणणे हेच पाप आहे. आता हा सगळा भाडोत्री पक्ष आहे. यांच्याकडे नेते, कार्यकर्ते नाहीत, म्हणून आजूबाजूचे नेते आणत आहेत, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी भाजपवर निशाणा साधला.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेली घटना बदलण्याचे प्रयत्न भाजप करीत आहे. राज्यघटना बदलण्यासाठी यांना ४०० चा आकडा पार करायचा आहे. ही लोकसभा निवडणूक मोदींच्या घशात गेली तर यापुढे निवडणुका होणार नाहीत. मोदी पुन्हा सत्तेत आले तर हुकूमशहा होतील. मोदी-शहा यांच्या सरकारला भ्रष्टाचाराची चाके आहेत. त्यामुळे हा भ्रष्टांना अभय देणाऱ्या सरकारला धडा शिकविण्याची वेळ आली आहे, असेही ठाकरे म्हणाले. यावेळी त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावरही हल्लाबोल केला. आमचे हिंदुत्व कोणाच्या पाठीत खंजीर खुपसणारे नाही. परंतु अमित शहा यांचे कामच पाठीत खंजीर खुपसणे हे आहे. पण पाठीत खंजीर खुपसला की समोरच्याचा कोथळा बाहेर काढायचा, ही शिवाजी महाराजांची शिकवण आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

भास्कर जाधव यांना दिला विश्वास

भास्कर जाधव यांनी कार्यकर्त्यांना बोलावून काही दिवसांपूर्वी पक्षाच्या नेत्यांबद्दल नाराजी व्यक्त केली होती. त्यावरून गुरुवारी उद्धव ठाकरे यांनी भास्करराव तुम्ही घाबरू नका, तुमच्या मागे आम्ही आहोत. असे म्हणत त्यांना विश्वास दिला. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात विनायक राऊत यांना निवडून दिले नसते, तर आज संपूर्ण कोकणात गुंडागर्दी झाली असती, असा आरोपही त्यांनी केला.

logo
marathi.freepressjournal.in