
नागपूर : नागपूरमधील दीक्षाभूमी परिसरातील भूमिगत पार्किंगचा मुद्दा चांगलाच तापला आहे. भूमिगत पार्किंगला विरोध करण्यासाठी हजारो आंदोलक दीक्षाभूमी परिसरात दाखल झाले आहेत. भूमिगत पार्किंगमुळं स्तुपाला धोका निर्माण होऊ शकतो, असं आंदोलकांचं म्हणणं आहे. गेल्या ७० वर्षांत पार्किंगची गरज भासली नाही, मग आत्ताच पार्किंगची का गरज लागली, असं विचारत काम तातडीनं थांबवण्याची मागणी आंदोलकांनी केली आहे. दरम्यान आक्रमक झालेल्या काही आंदोलकांनी बांधकामाची तोडफोड करण्याचा तसेच बांधकाम साहित्याला आग लावण्याचा प्रयत्न केला. या पार्श्वभुमीवर दीक्षाभूमी परिसरात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला असून आंदोलकांना शांततेचं आवाहन केलं आहे.
भूमिगत पार्किंगमुळं स्तुपाला धोका?
नागपूरमधील दीक्षाभूमी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अनुयायांसाठी तसेच संपूर्ण भारतीयांसाठी पवित्र ठिकाणांपैकी एक मानलं जातं. दरवर्षी देशभरातील लाखो लोक येथे भेट देतात. दरम्यान दीक्षाभूमी परिसरात भूमिगत पार्किंगमुळं स्तुपाला धोका निर्माण होऊ शकतो, त्यामुळं भूमिगत पार्किंगला विरोध केला आहे. दीक्षाभूमी स्मारक समितीच्या सदस्यांनी भूमिगत पार्किंगला विरोध करणाऱ्यांची बैठक बोलावली आहे. चर्चा झाल्यानंतर एमएमआरडीएने भूमिगत पार्किंगबाबत पुनर्विचार करण्याचे संकेत दिले आहेत. या पार्श्वभूमीवर दीक्षाभुमी परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पोलीसांनी आंदोलकांना शांतता आणि सुव्यवस्था राखण्याचं आवाहन केलं आहे. दरम्यान प्रकाश आंबेडकर यांनी आंदोलकांना पाठिंबा जाहीर केला आहे.
आंदोलकांकडून बांधकाम साहित्याची तोडफोड-
नागपुरात बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी येऊन संघनांनी दगडफेक केली आहे. दीक्षाभूमी परिसरात भूमिगत पार्किंगच्या विरोधासाठी काही संघटनांनी चलो दीक्षाभूमीचा नारा दिला होता. दरम्यान दीक्षा भूमीवर दाखल झालेल्या आंदोलकांनी सुरू असलेल्या बांधकामाची तोडफोड केली. आरसीसी स्ट्रक्चरचं बांधकाम आणि प्लेट उखडून टाकल्या आहे. तसेच काही ठिकाणी आग लावल्याचंही समोर आलं आहे.