
पुणे : नोकऱ्या, शाळा आणि महाविद्यालयांत मोफत शिक्षण, शासकीय रुग्णालयांत मोफत औषधे यासह विविध मागण्यांसाठी रविवारी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पुण्यातील मेट्रो स्थानकावर आंदोलन केले. यावेळी आंदोलकांनी काही वेळ मेट्रो सेवा रोखून धरली होती. त्याचा फटका प्रवाशांना बसला. दरम्यान, या आंदोलनाशी पक्षाचा काहीही संबंध नसल्याचे स्पष्टीकरण पक्षातर्फे देण्यात आले. नरेंद्र पावटेकर या कार्यकर्त्याने आपल्या समर्थकांसह पुणे महानगरपालिका मेट्रो स्थानकावर दुपारी १.३० वाजताच्या सुमारास जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी नरेंद्र पावटेकर यांनी ट्रॅकवर उतरत मेट्रो रोखून धरली. स्थानिकांना नोकऱ्या मिळाल्या पाहिजेत, अशी घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी आंदोलक आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाल्याचे समजते.
काही आंदोलकांनी पेट्रोलची बॉटल सोबत आणत स्वत:ला जाळून घेण्याची धमकी दिल्याचे सांगण्यात आले. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत आंदोलकांना अटक केली. दोन तासांनंतर आंदोलन संपुष्टात आले.
पावटेकर यांची पक्षातून हकालपट्टी
आंदोलनाशी पक्षाचा कोणताही संबंध नसल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने स्पष्ट केले. पक्षाने अधिकृत निवेदन काढून आंदोलक नरेंद्र पावटेकर यांची पक्षातून हकालपट्टी केल्याची माहिती दिली.