जुमलेबाज सरकारला सत्तेवरून खाली खेचा, खा. सुप्रिया सुळे यांचे आवाहन

येत्या विधानसभा निवडणुकीत हीच जनता अशा फसव्या योजनांना न भुलता, या जुमलेबाज सरकारला सत्तेवरून खाली खेचेल व याच महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर येईल, असा विश्वास खा. सुळे यांनी व्यक्त केला.
जुमलेबाज सरकारला सत्तेवरून खाली खेचा, खा. सुप्रिया सुळे यांचे आवाहन
Published on

कराड : केंद्रासह राज्यातील सत्ताधाऱ्यांच्या पायाखालची वाळू लोकसभा निवडणुकीत चांगलीच सरकली असून आता राज्यातील विधानसभा निवडणूक जसंजशी जवळ येईल तसंतसे सध्याचे जुमलेबाज सरकार फसव्या योजना आणून योजनांचा पाऊस पाडणार आहे परंतु महाराष्ट्रातील जनता हुशार आहे. येत्या विधानसभा निवडणुकीत हीच जनता अशा फसव्या योजनांना न भुलता, या जुमलेबाज सरकारला सत्तेवरून खाली खेचेल व याच महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर येईल, असा विश्वास खा. सुळे यांनी व्यक्त केला.

महाविकास आघाडीचे सरकार जे बोलणार तेच खरं करणार, मराठा-धनगर-लिंगायत-मुस्लिम आणि भटक्या विमुक्त जातीच्या आरक्षणाबाबतच्या मागणीसाठी पूर्ण ताकदीने उभे राहून आरक्षणाची मागणी पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही देत महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचारी व समाजविरोधी अशा 'एमबीबीएस' सरकारला महाराष्ट्रातून हद्दपार करून भ्रष्टाचारमुक्त महाराष्ट्रासाठी महाविकास आघाडीला संधी द्या, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्ष खा. सुप्रिया सुळे यांनी केले. मात्र याचवेळी कार्यकर्त्यांनी 'हवेत न राहता' कामाला लागावे, महिलांवरही प्रचाराची अधिक जबाबदारी टाकावी, अशा सूचनावजा इशाराही देण्यास खा. सुळे विसरल्या नाहीत.

येथील सह्याद्री सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावरील यशवंतनगर,ता कराड येथे रविवारी आयोजित केलेल्या कराड उत्तर विधानसभा मतदारसंघाच्या महिला मेळाव्यात त्या बोलत होत्या. खा. सुळे म्हणाल्या, सध्याचे सरकार आरक्षणाच्या नावाखाली जातीजातीमध्ये तेढ निर्माण करत असून भांडणे लावत आम्ही म्हणू तीच पूर्व दिशा हे एक नवीन पर्व सुरू केले आहे. श्रद्धा आणि अंधश्रद्धा याच्यामध्ये अंतर असले पाहिजे, सरकारने नैतिकतेच्या कोणत्याच मर्यादा ठेवल्या नाहीत, रामाचे सुद्धा राजकारण केले. महिलांना आरक्षण देण्यामागे शरद पवार यांची दिव्य दृष्टी होती,महिलांमधील कर्तुत्व आणि नेतृत्व बघूनच उंबरठा ओरडण्याची संधी महिलांना दिली, त्या संधीच सोने महिलांनी केले आहे. सामाजिक परिवर्तनासाठी महिलांनी पुढाकार घ्यावा. नुसते पंधराशे रुपये देऊन आमचे प्रश्न सुटणार नाहीत, ना आमच्या हुंड्याचा, ना महागाईचा, ना कौटुंबिक हिंसाचाराचा प्रश्न सुटणार आहे. पंधराशे रुपये बरोबरच प्रत्येक महिलेच्या हाताला काम मिळाले पाहिजे पंधराशे रुपयेला विकणारे आम्ही नाही. ५० खोके वाले तिकडे आहेत,आम्ही स्वाभिमानी माणसे आहोत. ५० खोके घेऊन तुमच्या आयुष्याचे सार्थक झाले, मते विकत घेण्याची ताकद देशात कोणामध्येही नाही हे लोकसभेच्या निवडणुकीत जनतेने दाखवून दिले आहे.

logo
marathi.freepressjournal.in