

पुणे : पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर येथे घडलेल्या अत्यंत संतापजनक बालिका अत्याचार व खून प्रकरणात पुणे ग्रामीण पोलिसांनी ११०० पानांचे सविस्तर आरोपपत्र विशेष न्यायालयात दाखल केले आहे.
या प्रकरणातील आरोपी भीमराव कांबळे याच्याविरोधात अवघ्या १५ दिवसांत तपास पूर्ण करून हे आरोपपत्र सादर करण्यात आले आहे. या गुन्ह्यामुळे संपूर्ण राज्य हादरले होते. पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पूर्ण करण्यात आला असून त्यांनी दिलेल्या आश्वासनानुसार जलदगतीने न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आले.
या प्रकरणात विशेष सरकारी वकील अजय मिसार आणि तपास अधिकारी निरीक्षक विजयमाला पवार यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. गुन्ह्याचा तपास करताना ५० हून अधिक साक्षीदारांचे जबाब, सीसीटीव्ही फुटेज, डीएनए चाचणी, वैद्यकीय अहवाल आणि न्यायवैद्यक पुरावे न्यायालयात सादर करण्यात आले आहेत. नसरापूर येथे १ मे रोजी घडलेल्या या घटनेत साडेतीन वर्षांच्या बालिकेवर अत्याचार करून तिचा खून करण्यात आला होता.
या घटनेनंतर राज्यभर तीव्र संताप व्यक्त झाला होता. पोलिसांनी आरोपीला काही तासांत अटक करून घटनास्थळ पंचनामा, तांत्रिक तपास आणि प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांचे जबाब नोंदवले. तीन मुलांनी आरोपीने पीडितेला गोठ्याकडे नेल्याचे पाहिल्याचे जबाब दिले असून ते महत्त्वाचे पुरावे मानले जात आहेत. या प्रकरणातील शवविच्छेदन अहवालात गंभीर स्वरूपाचे निष्कर्ष समोर आले असून, डीएनए आणि फॉरेन्सिक अहवालांनी आरोपांना अधिक बळ दिले आहे.