पुणे अपघात प्रकरण: आरोपी अल्पवयीन मुलासोबत दोघांचे रक्तनमुने बदलले; पोलिसांच्या आरोपपत्रातील माहिती

Pune Porsche Accident Case: कल्याणीनगर अपघात प्रकरणात मद्यधुंद अल्पवयीन कारचालक मुलासह त्याच्याबरोबर असलेल्या दोन मुलांच्या रक्ताचे नमुने पोलिसांसमक्ष बदलण्यात आले, असे आरोपपत्रात नमूद करण्यात आले आहे.
पुणे अपघात प्रकरण: आरोपी अल्पवयीन मुलासोबत दोघांचे रक्तनमुने बदलले; पोलिसांच्या आरोपपत्रातील माहिती
Published on

पुणे : कल्याणीनगर अपघात प्रकरणात मद्यधुंद अल्पवयीन कारचालक मुलासह त्याच्याबरोबर असलेल्या दोन मुलांच्या रक्ताचे नमुने पोलिसांसमक्ष बदलण्यात आले, असे आरोपपत्रात नमूद करण्यात आले आहे. यापूर्वी केवळ मोटारचालक मुलाऐवजी त्याच्या आईने रक्ताचे नमुने दिल्याची माहिती पोलिसांनी दिली होती.

कल्याणीनगर अपघात प्रकरणात ९०० पानांचे आरोपपत्र शिवाजीनगर न्यायालयात नुकतेच दाखल करण्यात आले. बांधकाम व्यावसायिक विशाल अगरवाल यांच्या मुलासह त्याच्याबरोबर असलेल्या दोन मित्रांचेही रक्ताचे नमुने बदलण्यात आले. ससून रुग्णालयातील मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या कक्षात डॉ. अजय तावरे याच्या आदेशानुसार डॉ. श्रीहरी हाळनोर याने एका कनिष्ठ महिला डॉक्टरच्या मदतीने रक्ताचे नमुने बदलले. त्यावेळी तेथे काही पोलीसही उपस्थित होते, असे आरोपपत्रात नमूद करण्यात आले आहे.

आरोपपत्रात आरोपींची संख्या, त्यांचा सहभाग, त्याबाबत साक्षीदारांचे जबाब, परिस्थितीजन्य आणि वैद्यकीय पुरावे याबाबतची माहिती देण्यात आली आहे. कल्याणीनगर भागात १९ मे रोजी मध्यरात्री अपघात झाला. अपघातात दुचाकीस्वार संगणक अभियंता अनिश अवधिया आणि त्याची मैत्रीण अश्विनी कोस्टा यांचा मृत्यू झाला. अपघात प्रकरणात बांधकाम व्यावसायिक विशाल अगरवालच्या मुलाला ताब्यात घेण्यात आले. मुलगा अल्पवयीन असल्याने येरवडा पोलिसांनी त्याला बाल न्याय मंडळात हजर केले. बाल न्याय मंडळाने त्याला वाहतूक समस्येवर ३०० शब्दांचा निबंध, वाहतूक पोलिसांबरोबर चौकात थांबून वाहतूक नियोजन करावे अशा अटी, शर्तींवर त्याला जामीन मंजूर केला. अपघातानंतर पंधरा तासांत मुलाची मुक्तता करण्यात आल्याने सामान्यांनी संताप व्यक्त केला. पोलिसांनी बाल न्याय मंडळाच्या निर्णयाला आव्हान दिले. त्यानंतर बाल न्याय मंडळाने मुलाची बालसुधारगृहात रवानगी केली.

अपघातानंतर मुलाला वाचविण्यासाठी वडील विशाल अगरवाल, आई शिवानी, आजोबा सुरेंद्र यांनी प्रयत्न केले. मोटारचालक गंगाधर हेरीक्रुब यांना अल्पवयीन मुलाने केलेला गु्न्हा अंगावर घेण्यासाठी धमकावले. ससून रुग्णालयात मुलाचे रक्ताचे नमुने बदलण्यात आले. मुलाला वाचविण्यासाठी आई शिवानीने स्वत:च्या रक्ताचे नमुने दिले. रक्ताचे नमुने बदलण्यासाठी ससूनमधील डॉ. अजय तावरे, डॉ. श्रीहरी हाळनोर यांना ससूनमधील शिपाई अतुल घटकांबळे यांच्यामार्फत तीन लाख रुपये देण्यात आले. अगरवाल यांचा परिचित अश्फाक इनामदार, अमर गायकवाड यांच्यामार्फत बाल न्याय मंडळाच्या आवारात घटकांबळेला पैसे देण्यात आले होते.

अपघात झाला त्यावेळी अल्पवयीन मुलासोबत मोटारीत त्याचे दोन मित्र होते. मित्र अल्पवयीन आहेत. ससून रुग्णालयात त्यांच्याही रक्ताचे नमुने घेतले. डॉ. तावरे याच्या सांगण्यानुसार, डॉ. हाळनोर याने एका कनिष्ठ महिला डॉक्टरला वैद्यकीय कक्षात बोलावून घेतले. तेथे अल्पवयीन मुलाऐवजी अन्य दोन मुलांचे रक्ताचे नमुने घेतले, अशी माहिती तपासात मिळाली होती. याप्रकरणी संबंधित महिला डॉक्टरचा तपशीलवार जबाब पोलिसांनी नोंदवला आहे. डॉ. हाळनोर याने अल्कोहोलमध्ये भिजवलेला कापूस न वापरता कोरड्या कापसाने रक्ताचे नमुने घेण्याची सूचना केली होती, असे या डॉक्टरने जबाबात नमूद केले.

logo
marathi.freepressjournal.in