
पुणे : पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीत २०० कोटींहून अधिक रकमेचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी सोमवारी केला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नावाचा गैरवापर केला जात असल्याचा दावा करत त्यांनी या प्रकरणी स्पष्टीकरण देण्याची मागणी पवार यांनी केली आहे. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उदात्तीकरण करणाऱ्या जाहिरातींच्या भव्य खर्चावर आणि कंत्राटदारांच्या हितासाठी झालेल्या कथित महसूल बुडवणुकीवरही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
बाजार समितीतील गैरव्यवहारांचा पाढा पत्रकार परिषदेत वाचताना रोहित पवार यांनी बाजार समितीतील भ्रष्टाचाराची अनेक धक्कादायक उदाहरणे दिली. यामध्ये पार्किंग वाटपात झालेला मोठा घोटाळा, सुरक्षारक्षक नेमणुकांमधील गैरव्यवहार, फूल बाजारातील गाळ्यांचे बेकायदेशीर वाटप आणि अनेक गाळे बाजार समितीच्या संचालकांनी नातेवाईकांना बेकायदा दिल्याचा समावेश आहे. हजारो बनावट परवाने देऊन शेतकऱ्यांची कोट्यवधी रुपयांची लूट केली जात असल्याचा आरोप त्यांनी केला. प्रत्यक्षात ९०० ते १००० अधिकृत परवानाधारक असताना ४००० बनावट परवाने देण्यात आले आहेत. तसेच, बाजार समितीतील शौचालये पाडून इतर धंदे सुरू करण्यात आले आहेत आणि मोठ्या प्रमाणात ड्रग्जची विक्री देखील होत आहे. या गैरव्यवहारात बाजार समितीचे संचालक आणि अधिकारी सहभागी असून, अजित गटाचे संचालक गणेश घुले यांनी ५६ जागा बेकायदेशीरपणे दिल्याचाही दावा करण्यात आला. या सर्व प्रकारामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असल्याचे रोहित पवार यांनी सांगितले.
राजकीय जाहिरातींचा १००-२०० कोटींचा घोटाळा
रोहित पवार राजकीय जाहिरातींच्या कथित घोटाळ्यावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. दोन दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीस यांचे उदातीकरण करणाऱ्या पहिल्या पानावरच्या जाहिरातींचा संदर्भ देत, त्यांनी या जाहिरातींवर १०० ते २०० कोटी रुपये खर्च झाल्याचा अंदाज व्यक्त केला. या जाहिरातीत नक्कीच काळभैर (काळा पैसा) झाल्याचा संशय व्यक्त करत त्यांनी उच्चस्तरीय चौकशीची मागणी केली. या जाहिराती कंत्राटदार किंवा व्यावसायिकांनी दिल्या असून, त्यामागे सरकारकडून त्यांना काही फायदा झाला असावा, असा आरोप त्यांनी केला. त्यांनी 'मेघा इंजिनीअरिंग' कंपनीचा उल्लेख करत म्हटले की, राज्य शासनाने या कंपनीला ९४ कोटी रुपयांचा दंड १७ लाखांपर्यंत कमी केला. 'मेघा इंजिनियर्स'ने निवडणुकीत भाजपला सर्वात जास्त पैसा दिला होता, त्यामुळे राज्य सरकार 'इलेक्टोरल बाँड'च्या देणगीचे ऋण फेडत आहे का, असा सवाल त्यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना विचारला.
बीसीसीआयची निवडणूक लढण्यास इच्छुक
राजकारणात मी आलो म्हणजे केवळ आमदार होण्यासाठी नाही. मीदेखील महत्त्वाकांक्षी आहे. बीसीसीआय या क्रिकेटच्या संघटनेची अध्यक्षपदाची निवडणूक लढवण्याची भूमिका मीदेखील मनात ठेवली आहे. यासंदर्भात मी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याशीदेखील चर्चा करणार आहे. ऑलिंपिक समितीत मी अद्याप लक्ष दिलेले नाही, असे सांगत भविष्यात त्याकडेही लक्ष देण्याचे सूतोवाच त्यांनी केले.
अजित पवारांच्या नावाचा कथित वापर आणि आंदोलनाचा इशारा
आमदार रोहित पवार यांनी आरोप केला आहे की, बाजार समितीचे संचालक आणि पालकमंत्री अजित दादांचे नाव दिवसाढवळ्या वापरतात आणि त्यांच्या नावाने या ठिकाणी घोटाळा करतात. ते म्हणाले की, यामध्ये अजित दादांचे नाव वापरले जात असल्याने, त्यांची या घोटाळ्याला पाठराखण आहे का, हे सिद्ध होत आहे. पुढील पंधरा दिवसांत कोणतीही ठोस कारवाई न झाल्यास शेतकऱ्यांसोबत बाजार समितीत मोठे आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. अजित दादा हे कडक नेते असून, ते पारदर्शकता ठेवतात असे मानले जाते, त्यामुळे या घोटाळ्यावर ते नेमके काय करतात याकडे आम्ही लक्ष ठेवून आहोत, असेही रोहित पवार यांनी नमूद केले.
अजित पवारांची 'कच्ची हिंदी' आणि पक्षातील गोंधळ
उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आयपीएस अधिकारी अंजना कृष्णा यांच्यातील व्हायरल झालेल्या संवादावरही रोहित पवार यांनी भाष्य केले. रोहित पवार म्हणाले, अजित दादांची हिंदी कच्ची आहे आणि त्या हिंदीमधील गडबडीमुळेच ते अडचणीत आले. अंजना कृष्णा या महिला अधिकारी किंवा तेथील अधिकारी कोणीही चुकले नाहीत, असे त्यांनी स्पष्ट केले. या प्रकरणी आमदार अमोल मिटकरी यांनी जी भूमिका घेतली, ती चुकीची होती आणि त्यांनी ती अजित दादांना खुश करण्यासाठी घेतली असावी. या घटनेनंतर अजित पवारांना अप्रत्यक्षपणे माफी मागावी लागली आणि मिटकरींनाही माघार घ्यावी लागली, यावरून त्यांच्या पक्षात सध्या गोंधळ सुरू असल्याचे रोहित पवार म्हणाले.