

पुणे : पुणे-बंगळुरू महामार्गावरील देहूरोड बायपासवर गुरुवारी पहाटे झालेल्या भीषण अपघातात सिम्बायोसिस कॉलेजचे दोन विद्यार्थी जागीच मृत्युमुखी पडले, तर दोघे गंभीर जखमी झाले. भरधाव स्विफ्ट डिझायर कार समोरील आयशर कंटेनरवर आदळल्याने हा अपघात घडला.
गुरुवारी पहाटे सुमारे पावणे सहा वाजता ही घटना घडली. दिव्य राजसिंह प्रेमसिंह राठोड (२०) आणि सिद्धांत आनंद शेखर (२०) यांचा जागीच मृत्यू झाला. हर्ष मिश्रा (२१) आणि निहार तांबोळी (२०) हे जखमी असून, त्यांच्यावर वाकड येथील लाईफलाइन हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. आयशर कंटेनरचालक मनीष कुमार सुरज मणिपाल (३९, वडाळा) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
देहूरोड पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक विक्रम बनसोडे यांनी सांगितले की, बुधवारी रात्री चारही विद्यार्थी लोणावळा येथे फिरायला गेले होते. परत येताना देहूरोड बायपासवर त्यांची कार भरधाव वेगात असताना समोरील कंटेनरवर जोरात आदळली. धडकेचा जोर एवढा होता की कारचा पुढील भाग अक्षरशः चक्काचूर झाला.
पोलिसांच्या प्राथमिक अंदाजानुसार, कारचा वेग जास्त असल्यामुळे हा अपघात झाल्याची शक्यता आहे. अपघाताच्या नेमक्या कारणांचा तपास सुरू असून, या घटनेमुळे महाविद्यालयीन विद्यार्थी वर्गात हळहळ व्यक्त होत आहे.