पुणे जिल्हा हादरला! चिमुकल्यांवर अत्याचार करून हत्येच्या दोन घटना; नसरापूरमध्ये कडकडीत बंद, 'रास्ता रोको' आंदोलन

पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यात नसरापूर येथे एका चार वर्षीय निष्पाप चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करून तिची निघृण हत्या करण्यात आल्याची काळीज पिळवटून टाकणारी घटना उघडकीस आली आहे.
पुणे जिल्हा हादरला! चिमुकल्यांवर अत्याचार करून हत्येच्या दोन घटना; नसरापूरमध्ये कडकडीत बंद, 'रास्ता रोको' आंदोलन
पुणे जिल्हा हादरला! चिमुकल्यांवर अत्याचार करून हत्येच्या दोन घटना; नसरापूरमध्ये कडकडीत बंद, 'रास्ता रोको' आंदोलन
Published on

पुणे : पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यात नसरापूर येथे एका चार वर्षीय निष्पाप चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करून तिची निघृण हत्या करण्यात आल्याची काळीज पिळवटून टाकणारी घटना उघडकीस आली आहे, तर चाकण परिसरातील खालुंब्रे येथे एका तीन वर्षांच्या चिमुरड्यावर अनैसर्गिक अत्याचार करून त्याची चाकूने गळा चिरून निघृण हत्या करण्यात आल्याची दुसरी धक्कादायक घटना घडली आहे.

या धक्कादायक प्रकारांमुळे संपूर्ण पुणे जिल्हा हादरला असून, नसरापूरच्या घटनेतील नराधम आरोपीला फाशीच्या शिक्षेची मागणी करत संतप्त ग्रामस्थांनी शनिवारी नसरापूरमध्ये कडकडीत बंद पाळला आणि पुणे-सातारा महामार्गावर तब्बल दोन तास 'रास्ता रोको' आंदोलन केले.

ही चिमुकली उन्हाळ्याच्या सुट्टीसाठी आपल्या आजोळी आली होती. भीमराव कांबळे (वय ६०) या नराधमाने तिला 'वासरू दाखवतो' असे आमिष दाखवून गुरांच्या गोठ्यात नेले. शुक्रवारी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास ती राम मंदिर परिसरात खेळत असताना बेपत्ता झाली. बराच वेळ होऊनही मुलगी घरी न परतल्याने नातेवाइकांनी शोध सुरू केला आणि गावातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता त्यात सीसीटीव्ही फुटेजमध्ये ही बालिका अत्यंत निरागसपणे आरोपीसोबत जाताना दिसून आली. सायंकाळी साडेपाचच्या सुमारास ग्रामस्थांनी आरोपीला बनेश्वर फाट्यावरून पकडून बेदम चोप दिला, त्यानंतर त्याने आपला गुन्हा मान्य करत मृतदेह लपवून ठेवलेली जागा सांगितली. शेणाच्या ढिगाऱ्याखाली लपवलेला पीडितेचा मृतदेह बाहेर काढताच गावकऱ्यांचा उद्रेक झाला.

या घटनेनंतर संतप्त ग्रामस्थांनी शुक्रवारी रात्री राजगड पोलीस ठाण्याला घेराव घातला आणि बंगळुरू महामार्गावर 'रास्ता रोको' केला. पोलीस अधीक्षक गिल यांनी घटनास्थळी धाव घेऊन लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले असले, तरी शनिवारी नसरापुरात कडकडीत बंद पाळण्यात आला. शनिवारी सकाळी फॉरेन्सिक टीमने घटनास्थळी पोहोचून पुरावे गोळा केले. भैरवनाथ मंदिरापासून निघालेल्या मोर्चात नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते, ज्याचे रूपांतर नंतर सभेत झाले. भोरचे आमदार शंकर मांडेकर आणि माजी आमदार संग्राम थोपटे यांनी मोर्चेकऱ्यांची भेट घेऊन हे प्रकरण फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवण्याचे आश्वासन दिले. यावेळी आंदोलकांनी थेट मुख्यमंत्र्यांशी बोलण्याची मागणी लावून धरली होती, त्यानंतर मंत्री आदिती तटकरे यांच्याशी चर्चा करून आणि ठोस कारवाईच्या आश्वासनानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले.

आरोपीला मृत्यूदंडाची मागणी करणार - मुख्यमंत्री

या घटनेवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, पुणे जिल्ह्यातील घटना अत्यंत निंदनीय आणि धक्कादायक असल्याचे म्हटले आहे. आरोपीला अटक झाली आहे. आरोपीचे अशाप्रकारचे जुने संदर्भही दिसत आहेत. या घटनेबाबत समाजातून मोठा रोष आहे. सर्वांना या घटनेमुळे पीडित मुलीच्या परिवाराबद्दल प्रचंड हळहळ वाटत आहे. आरोपीला अटक केली आहे, मी आश्वस्त करू इच्छितो की फास्ट ट्रॅक कोर्टात प्रकरण नेऊ. स्पेशल फास्ट ट्रॅक कोर्ट तयार करायला आम्ही हाय कोर्टाला विनंती करू. विशेष सरकारी वकील देऊन आरोपीला मृत्यूदंडाची मागणी करणार आहोत.

logo
marathi.freepressjournal.in