पुण्यात आजपासून पुस्तक महोत्सव; ८०० दालने, ग्रंथदिंडी, सांस्कृतिक कार्यक्रमांसह वाचनाचे पर्व सुरू

वाचक, विद्यार्थी आणि पुस्तकप्रेमींसाठी मेजवानी ठरणाऱ्या पुणे पुस्तक महोत्सवाचे उद्घाटन आज, शनिवार १३ डिसेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता होणार आहे.
पुण्यात आजपासून पुस्तक महोत्सव
पुण्यात आजपासून पुस्तक महोत्सव
Published on

पुणे : वाचक, विद्यार्थी आणि पुस्तकप्रेमींसाठी मेजवानी ठरणाऱ्या पुणे पुस्तक महोत्सवाचे उद्घाटन आज, शनिवार १३ डिसेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता होणार आहे.

फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावर १३ ते २१ डिसेंबरदरम्यान आयोजित हा महोत्सव ८०० पुस्तक दालने, चिल्ड्रेन कॉर्नर, युवक-युवतींसाठी सांस्कृतिक कार्यक्रम, पुणे लिटरेचर फेस्टिव्हल आणि ४० हून अधिक खाद्यपदार्थांच्या स्टॉल्समुळे विशेष आकर्षण ठरणार आहे.

या कार्यक्रमासाठी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष विश्वास पाटील, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, केंद्रीय नागरी वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ तसेच साहित्य-संस्कृती क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

ग्रंथदिंडीचे आयोजन

उद्घाटनापूर्वी पुणे शहरातील ७५ महाविद्यालयांच्या सहभागातून ‘ज्ञान सरिता ग्रंथ दिंडी’ काढण्यात येणार आहे. भारतीय ज्ञान प्रणाली (IKS) या संकल्पनेवर आधारित ही दिंडी दुपारी २.३० वाजता मॉडर्न कॉलेजमधून सुरू होऊन जंगली महाराज रस्त्याने फर्ग्युसन कॉलेजवर सायंकाळी ५ वाजता पोहोचेल. सुमारे ७ हजार विद्यार्थी आणि नागरिकांच्या उपस्थितीत महोत्सवाचे उद्घाटन होईल. ग्रंथदिंडीत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना आणि महाविद्यालयांना त्यांच्या ग्रंथालयासाठी पुस्तके खरेदी करण्यासाठी विशेष कूपन देण्यात येणार आहेत.

पुस्तक महोत्सवातील वैशिष्ट्ये

८०० दालनांमध्ये सर्व भारतीय भाषांतील विविध विषयांचा समावेश असणार आहे. त्याचबरोबर भगवान बिरसा मुंडा यांच्या १५०व्या जयंतीनिमित्त विशेष दालन उभारण्यात आले आाहे. या महोत्सवात ‘आनंदमठ’ या दालनास भेट देणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यास पुस्तक व खाऊ भेट दिला जाणार आहे. दरदिवशी नामांकित प्रकाशकांची नवीन पुस्तकांचे प्रकाशन होणार आहे. साहित्यिक चर्चासत्रे आणि संवादांचे आयोजन देखील केले जाणार आहे. लेखकांसाठी असणाऱ्या विशेष ऑथर कॉर्नरचा त्यांना अनुभव घेता येणार आहे. चिल्ड्रेन कॉर्नरमध्ये विवीध उपक्रमासह, स्पर्धा व कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. १३ डिसेंबरपासून दररोज सायंकाळी मोफत सांस्कृतिक कार्यक्रम, १६ डिसेंबरपासून सकाळी ११ वाजता साहित्यिक संवादाचा आनंद घेता येणार आहे.

वाचनप्रेमींसाठी भव्य उत्सव

या महोत्सवात सर्व भारतीय भाषांतील पुस्तके १० टक्के सवलतीत उपलब्ध राहणार असून, वाचन संस्कृती जोपासण्यासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन मुख्य संयोजक राजेश पांडे यांनी केले आहे. पुणे पुस्तक महोत्सवात प्रवेश मोफत असून, नागरिकांना रोज सकाळी १० ते रात्री १० या वेळेत सजलेल्या पुस्तकदालनांना भेट देता येणार आहे. वाचनप्रेमींसाठी हा महोत्सव ज्ञान, संस्कृती आणि साहित्याचा भव्य उत्सव ठरणार आहे.

लार्जेस्ट डिस्प्ले ऑफ पोस्टर्सचा विश्वविक्रम

पुणे पुस्तक महोत्सवाच्या उद्घाटनाच्या पूर्वसंध्येला 'लार्जेस्ट डिस्प्ले ऑफ पोस्टर्स ' हा विश्वविक्रम गिनिस वर्ल्ड रेकॉर्डसमध्ये प्रस्थापित करून, भारतातील बोलीभाषेला आणि आदिवासी शब्दांना मुख्य प्रवाहात आणण्याचा यशस्वी प्रयत्न झाला आहे. आकाशात फुगे सोडून या विश्वविक्रमाचा पुणेकरांनी आनंद व्यक्त केला. हा विश्वविक्रम खऱ्या अर्थाने भगवान बिरसा मुंडा यांच्या थोर कार्याला अभिवादन करणारा ठरल्याचे मत तज्ज्ञांनी पुणे पुस्तक महोत्सवात आयोजित विशेष कार्यक्रमात व्यक्त केले आहे. लार्जेस्ट डिस्प्ले ऑफ पोस्टर्स हा विश्वविक्रम यापूर्वी अमेरिकेच्या नावावर होता. अमेरिकेने फेब्रुवारी २०२५ मध्ये १३६५ पोस्टर्सच्या सहाय्याने हा विक्रम केला होता आता हाच विषय उपक्रम पुणे पुस्तक महोत्सवात मोडीत निघाला असून, १६७८ पोस्टर्स च्या सहाय्याने नवा लार्जेस्ट डिस्प्ले ऑफ पोस्टर्स हा विश्वविक्रम प्रस्थापित करण्यात आला आहे, अशी माहिती गिनिस वर्ल्ड रेकॉर्डसचे स्वप्नील डांगरीकर यांनी सांगितले. या विश्वविक्रमात भारताने अमेरिकेला मागे टाकले आहे.

logo
marathi.freepressjournal.in