पुण्यात भरधाव टेम्पोने तीन विद्यार्थ्यांना चिरडले; अन्य दोन जखमी, बोपदेव घाटात दुर्घटना

पुणे येथील बोपदेव घाटाच्या तीव्र उतारावरून सुसाट आलेल्या टेम्पोने स्कूल बसची वाट पाहत थांबलेल्या विद्यार्थ्यांना चिरडले. टेम्पोने कारला धडक दिल्यानंतर चालकाचे नियंत्रण सुटले आणि तो थेट विद्यार्थ्यांमध्ये घुसला. या भीषण अपघातात ट्रिनिटी कॉलेजच्या तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला, तर दोघे गंभीर जखमी झाले.
पुण्यात भरधाव टेम्पोने तीन विद्यार्थ्यांना चिरडले; अन्य दोन जखमी, बोपदेव घाटात दुर्घटना
पुण्यात भरधाव टेम्पोने तीन विद्यार्थ्यांना चिरडले; अन्य दोन जखमी, बोपदेव घाटात दुर्घटना
Published on: 

पुणे येथील बोपदेव घाटाच्या तीव्र उतारावरून सुसाट आलेल्या टेम्पोने स्कूल बसची वाट पाहत थांबलेल्या विद्यार्थ्यांना चिरडले. टेम्पोने कारला धडक दिल्यानंतर चालकाचे नियंत्रण सुटले आणि तो थेट विद्यार्थ्यांमध्ये घुसला. या भीषण अपघातात ट्रिनिटी कॉलेजच्या तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला, तर दोघे गंभीर जखमी झाले.

येवलेवाडी-बोपदेव घाट रस्त्यावर बुधवारी दुपारी घडलेल्या या दुर्घटनेने परिसर हादरून गेला. या दुर्घटनेत विशाल दांगडे आणि मोहिनी चौधरी यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर सिद्धेश राजे याला ऊग्णालयात दाखल करण्यापूर्वीच डॉक्टरांनी मृत घोषित केले. श्वेता तळेकर आणि सोहम घंगाळे हे या अपघातात गंभीर जखमी झाले आहेत. टेम्पो चालकाचे नियंत्रण सुटल्याने टेम्पोने विद्यार्थ्यांना धडक दिली, अशी माहिती येवलेवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मारूती पाटील यांनी दिली.

याप्रकरणी प्रतीक माऊती चव्हाण (वय २२, रा. घुलेश्वर, माळशिरस, ता. पुरंदर) या चालकाला ताब्यात घेतल्याची माहिती पोलिसांनी दिली. याप्रकरणी येवलेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशीरापर्यंत सुरू होते. भरदुपारी घडलेल्या या भीषण दुर्घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बोपदेव घाटाकडून येवलेवाडीच्या दिशेने आयशर टेम्पो (एमएच ०४ एफडी ७६५४) भरधाव येत होता. येवलेवाडीकडून बोपदेव घाटाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील बसथांब्याजवळ ट्रिनिटी कॉलेजचे २० ते २५ विद्यार्थी बसची प्रतीक्षा करीत उभे होते. बसथांब्यापासून सुमारे ५० मीटर अंतरावर वाहतूक संथ होती. त्याचवेळी घाटाच्या उतारावरून वेगाने आलेल्या टेम्पोने पुढे चाललेल्या कारला मागून जोरदार धडक दिली. कारला धडक दिल्यानंतर टेम्पोचालकाचे नियंत्रण सुटले. अनियंत्रित झालेला टेम्पो बसथांब्यावर बसची वाट पाहत असलेल्या विद्यार्थ्यांच्या घोळक्यात घुसला.

टेम्पोच्या जोरदार धडकेत पाच विद्यार्थी गंभीर जखमी झाले. यातील दोघांचा जागीच मृत्यू झाला, तर एकाला रुग्णालयात मृत घोषित करण्यात आले. अपघाताची माहिती मिळताच येवलेवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक मारूती पाटील यांच्यासह पथकाने घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक नागरिकांच्या मदतीने जखमी विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या ऊग्णालयांत दाखल करण्यात आले आहे.

टेम्पोचालक ताब्यात

अपघातास कारणीभूत ठरलेल्या टेम्पो चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले. टेम्पोचा वेग, चालकाचे नियंत्रण नेमके कशामुळे सुटले, तसेच अपघाताच्या वेळी वाहनाची स्थिती काय होती, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. या अपघाताचे सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झाले आहे.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)