बोपदेव घाट सामूहिक बलात्कारप्रकरणी मोठी अपडेट; आरोपी पोलिसांच्या ताब्यात

येवलेवाडी परिसरातील सीसीटीव्ही चित्रीकरणातून मिळालेल्या माहितीनंतर एकाला येवलेवाडी परिसरातून ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर पसार झालेल्या दोघांना नागपूरमधून ताब्यात घेण्यात आले
बोपदेव घाट सामूहिक बलात्कारप्रकरणी मोठी अपडेट; आरोपी पोलिसांच्या ताब्यात
Published on

पुणे : बोपदेव घाटातील सामूहिक बलात्कार प्रकरणात ४० गावांतील ४५० सराईतांची चौकशी केल्यानंतर पोलिसांच्या हाती महत्त्वाचे धागेदोरे लागले आहेत. याप्रकरणी पोलिसांनी शुक्रवारी एकाला अटक केली असून दोघांना नागपूर येथून ताब्यात घेण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे.

बोपदेव घाटात तरुणीवर झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणात घटनास्थळाच्या पोलिसांनी परिसरातील ४० गावे, वाड्या, वस्तींवरील ४५० सराईतांची चौकशी केली. पुणे जिल्ह्यातील घाट, तसेच टेकड्यांच्या परिसरात लूटमार, विनयभंग, बलात्कार असे गंभीर गुन्हे दाखल असलेल्या सराईतांची पोलिसांकडून चौकशी करण्यात आली होती. तपासात, तसेच येवलेवाडी परिसरातील सीसीटीव्ही चित्रीकरणातून मिळालेल्या माहितीनंतर एकाला येवलेवाडी परिसरातून ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर पसार झालेल्या दोघांना नागपूरमधून ताब्यात घेण्यात आले आहे. सध्या तिघांची कसून चौकशी सुरू असल्याचे समजते.

बोपदेव घाट परिसरात ३ ऑक्टोबरला रात्री मित्राबरोबर फिरायला आलेल्या महाविद्यालयीन तरुणीवर सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची घटना घडली होती. पसार झालेल्या आरोपींचा माग काढण्यासाठी पोलिसांनी ६० पथके तयार केली. गेल्या १५ दिवसांत बोपदेव घाटमार्गे गेलेल्या ५० हजार मोबाईल वापरकर्त्यांच्या माहितीचे तांत्रिक विश्लेषण करण्यात आले. बोपदेव घाटातील मोबाईल संपर्क यंत्रणा क्षीण असल्याने तांत्रिक तपासात अडथळे आले. आरोपी सासवडमार्गे पसार झाल्याची शक्यता असल्याने घटनास्थळापासून ७० ते ८० किलोमीटरपर्यंतचे सीसीटीव्ही चित्रीकरण पोलिसांकडून तपासण्यात आले होते.

पोलिसांनी रस्त्याच्या कडेला असलेल्या अनेक हॉटलवरील सीसीटीव्ही तपासले. चित्रीकरणात संपूर्ण परिसर दिसत नसल्याने अडचणी आल्या. ग्रामीण पोलिसांच्या सासवड, राजगड पोलीस ठाण्यातील तपास पथकांची मदत घेण्यात आली.

तपास पथकात ७०० पोलीस कर्मचारी

बोपदेव घाटातील सामूहिक बत्वात्कार प्रकरणाचा पुणे पोलिसांकडून अहोरात्र तपास करण्यात येत आहे. तपास पथकात जवळपास ७०० पोलीस कर्मचारी सहभागी असून या प्रकरणाचा पूर्ण छडा लावण्याचा प्रयत्न सुरू आहे.

logo
marathi.freepressjournal.in