

पुणे : ‘माझा अमेडिया कंपनीचे भागीदार दिग्विजय पाटील, शीतल तेजवानी किंवा अमेडिया कंपनीचे इतर भागीदार यांच्याशी कोणताही व्यवहार झालेला नाही. माझा त्यांचा परिचय नसून, मी त्यांना कधी भेटलोही नाही. त्यामुळे माझा दाखल गुन्ह्याशी काही संबंध नाही.
हा दाखल झालेला गुन्हा गैरसमजुतीने, खोट्या पद्धतीने झाला असून, तो निराधार आहे,’ असे स्पष्टीकरण बांधकाम व्यावसायिक हेमंत गवंडे यांनी पत्रकार परिषदेत दिले. प्रसंगी या जागेचे इनामी (मूळ मालक) विद्वांस उपस्थित होते.
पार्थ पवार यांच्या 'अमेडिया' या कंपनीची तसंच पुण्यातील मुंढवा येथील कथित महार वतनाची जमीन खरेदी व्यवहार प्रकरणाची राज्यभर जोरदार चर्चा सुरू आहे.
पुणे शहरातील कृषी विभागाच्या कथित जमिनीबाबत अपहार केल्याप्रकरणी तीन दिवसांपूर्वी पुण्यातील खडक पोलीस स्टेशन येथे तहसीलदार यांच्यासह ८ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेले व्यावसायिक हेमंत गवंडे यांनी पत्रकार परिषद घेऊन वरील स्पष्टीकरण दिले.