आज पुण्यामध्ये (Pune) कसबा पेठ आणि चिंचवड मतदारसंघामध्ये पोटनिवडणुकीला सुरुवात झाली आहे. अशामध्ये निवडणुकीआधी महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये आरोप प्रत्यारोपाच्या फेरी पाहायला मिळाल्या. एकीकडे काल काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी भाजपने पैसे वाट्ल्याचा आरोप केला. तर, आज कसबा मतदारसंघामध्ये एका मतदाराने भाजपच्या माजी नगरसेवकाने हल्ला केल्याचा आरोप केला आहे. गंजपेठेमध्ये हा प्रकार घडला असून, अद्याप याप्रकरणी कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, पोटनिवडणुकीच्या आदल्या दिवशी रात्री उशिरा पुण्यातील गंज पेठेत पैसे वाटण्यावरुन मोठा गोंधळदेखील झाला होता. पैसे न घेतल्याने एका महिलेला मारहाण करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी भाजपच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कॉंग्रेसचे माजी आमदार रमेश बागवे यांनी हे आरोप करत तक्रार दाखल केली. त्यांनी आरोप केला की, गंजपेठ परिसरातील भाजपचे माजी नगरसेवक विष्णू अप्पा हरिहर यांचा भाऊ हिरा हरिहर यांनी पैसे न घेतल्याने एका महिलेला मारहाण केली.