पुण्यात गरीब रुग्ण राखीव बेडपासून वंचित; ५८ पैकी १२ रुग्णालयांची नियमांकडे पाठ

गेल्या वर्षामध्ये पुणे शहरातील ५८ पैकी १२ रुग्णालयांनी एकाही गरीब रुग्णासाठी बेड राखीव ठेवले नाही.
पुण्यात गरीब रुग्ण राखीव बेडपासून वंचित; ५८ पैकी १२ रुग्णालयांची नियमांकडे पाठ
Published on

पुणे : गेल्या वर्षामध्ये पुणे शहरातील ५८ पैकी १२ रुग्णालयांनी एकाही गरीब रुग्णासाठी बेड राखीव ठेवले नाही. नियमानुसार त्यांच्यावर कमी दरामध्ये किंवा मोफत उपचारही केले नाहीत’, अशी धक्कादायक माहिती आता समोर आली आहे.

पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने दाखवलेल्या पैशाच्या हव्यासापोटी एका गर्भवती महिलेला वेळेत उपचार न केल्याने तिचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. मृत महिलेच्या नातेवाईकांनी तक्रार केल्यानंतर रुग्णालयाविरोधात आंदोलने करण्यात आली तसेच गर्भवतीच्या मृत्यूनंतर जिल्ह्यातील धर्मादाय रुग्णालयांनी किती रुग्णांना सेवा दिली, याविषयी काही प्रश्न उपस्थित झाले होते. त्यानंतर आता धर्मादाय आयुक्त कार्यालयातूनच याबाबतची आकडेवारी समोर आली आहे.

धर्मादाय आयुक्त कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, जानेवारी ते डिसेंबर २०२४ एका वर्षात पुणे जिल्ह्यातील ८६ हजार ८२६ रुग्णांवर उपचार करण्यात आलेले आहेत. यामध्ये सर्वात जास्त उपचार सिंहगड डेंटल महाविद्यालयाच्या रुग्णालयात करण्यात आले आहेत. तर दीनदयाळ मेमोरियल रुग्णालय, एन. ए. वाडिया रुग्णालयसह इतर १२ रुग्णालयांनी एकाही रुग्णावर मोफत उपचार केले नसल्याचा प्रकार आता उघडकीस आला

आहे. त्यामुळे आता धर्मादाय रुग्णालये केवळ नावाला धर्मादाय राहिलेत का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

केवळ ८६ हजार ८२६ रुग्णांवर उपचार

वर्षभरात रुग्णालयात रुग्णांकडून जमा होणाऱ्या एकूण बिलांपैकी दोन टक्के रक्कम धर्मादाय योजनेतून उपचारासाठी राखून ठेवावी लागते. रुग्णालयांमध्ये सर्रास रोख बिले घेतली जातात. सर्वच बिले कागदोपत्री दाखवली जात नाहीत. सहाजिकच धर्मादायमधून उपचारही कमी होतात. पुणे जिल्ह्यात हजारो कोटींची उलाढाल होणाऱ्या रुग्णालयांमध्ये वर्षभरात केवळ ८६ हजार ८२६ रुग्णांवर उपचार करण्यात आले आहेत.

'त्या' रुग्णालयाची नावे

पुणे जिल्ह्यातील महात्मा गांधी नेत्र रुग्णालय, जोशी रुग्णालय, रत्ना मेमोरियल रुग्णालय, हरजीवन रुग्णालय, दीनदयाळ मेमोरियल रुग्णालय , एन. एम. वाडिया रुग्णालय , मीरा रुग्णालय , परमार रुग्णालय, गिरीराज रुग्णालय, डॉ. जल मेहता रुरल क्रिटिकल केअर सेंटर, मातोश्री मदनबाई धारीवाल रुग्णालय, काशीबाई नवले जनरल रुग्णालय या रुग्णालयांमध्ये गरीब रुग्णासाठी बेड राखीव ठेवले जात नसल्याचे समोर आले आहे.

logo
marathi.freepressjournal.in