पुण्यात काँग्रेस-शिवसेना ठाकरे गट एकत्र लढणार

पुणे महानगरपालिका निवडणूक काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष एकत्र लढवणार असल्याची घोषणा ठाकरे गटाचे नेते सचिन अहिर आणि काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केली. त्यामुळे पुण्यात दोन राष्ट्रवादी, भाजप व शिंदे गट तसेच काँग्रेस व ठाकरे सेना अशी तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे.
पुण्यात काँग्रेस-शिवसेना ठाकरे गट एकत्र लढणार
Published on

पुणे : पुणे महानगरपालिका निवडणूक काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष एकत्र लढवणार असल्याची घोषणा ठाकरे गटाचे नेते सचिन अहिर आणि काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केली. त्यामुळे पुण्यात दोन राष्ट्रवादी, भाजप व शिंदे गट तसेच काँग्रेस व ठाकरे सेना अशी तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे.

पुण्यात दोन राष्ट्रवादी एकत्रितरीत्या लढणार आहेत, तर भाजप व शिवसेना शिंदे गटाची युती होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस व ठाकरे सेनेने एकत्र येत आपण निवडणुकीसाठी सज्ज असल्याचा संदेश दिला आहे. यावेळी बोलताना सतेज पाटील म्हणाले, ‘काँग्रेस आणि ठाकरे गट पुण्यात एकत्र निवडणूक लढणार आहेत. १६५ नगरसेवक असलेल्या पुणे महानगरपालिकेत काँग्रेस ६० आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना ४५ जागा लढवणार आहे. उर्वरित जागांबाबत पुन्हा चर्चा करून निर्णय घेतला जाईल. पुण्यात काँग्रेस आणि ठाकरे गटाकडून राज ठाकरे यांच्या मनसेलाही सोबत घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षासोबत आमच्या दोन बैठका झाल्या. अंकुश काकडे यांच्याशीही माझी चर्चा झाली. आम्ही गाफील नव्हतो, दक्ष होतो. बॅकडोअर चर्चा सुरू होती,’ असेही त्यांनी सांगितले. काँग्रेसकडे वंचितनेही प्रस्ताव पाठविला असल्याचेही त्यांनी नमूद केले..

मनसे, रासपसोबत चर्चा सुरू - सचिन अहिर

आमचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला आहे. मनसे, रासप व इतर पक्षांसोबत आमची चर्चा सुरू आहे. मनसेने आम्हाला ३२ नावांची यादी दिली होती. ती नावे कमी करुन २१ जणांची अंतिम यादी आम्हाला मिळाली आहे. त्यावर चर्चा करणार आहे. विरोधातील सगळे पक्ष आमच्यासोबत आहेत. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेससोबत आम्ही जाणार नाही हे आधीच सांगितले होते. अजित पवार हे दर आठवड्याला कॅबिनेटला बसतात. त्यांनी सत्तेतून बाहेर पडावे, मग आम्ही त्यांच्याशी चर्चा करू, असे सचिन अहिर यांनी सांगितले.

भाजपला बंडखोरांचा तडाखा

पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर भारतीय जनता पक्षाला एकापाठोपाठ एक मोठे धक्के बसू लागले आहेत. पक्षाची उमेदवारी जाहीर होताच नाराजीचा स्फोट झाला असून, तिकीट न मिळाल्याने अनेक बंडखोरांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या 'जिजाई' निवासस्थानी धाव घेत सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. भाजपचे माजी नगरसेवक धनंजय जाधव यांनी पक्षाला रामराम ठोकला आहे. शिवाजीनगर-मॉडेल कॉलनी (प्रभाग क्रमांक १२) मधील माजी उपमहापौर मुकारी आलगुडे यांनीही भाजपला सोडचिठी देत अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. माजी नगरसेवक शंकर पवार हे देखील राष्ट्रवादीच्या वाटेवर आहेत.

logo
marathi.freepressjournal.in