पुणे हादरले! जन्मदात्याने पोटच्या लेकीवर कुऱ्हाडीने सपासप वार करून संपवले

उपचारासाठी ससून रुग्णालयात नेत असतानाच तिचा मृत्यू झाला
पुणे हादरले! जन्मदात्याने पोटच्या लेकीवर कुऱ्हाडीने सपासप वार करून संपवले

पुण्यातून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. जन्मदात्या बापानेच पोटच्या मुलीला संपवल्याची घटना वाघोलीमध्ये घडली आहे. यानंतर आरोपी पिता फरार झाला असून पोलिस त्याचा शोध घेत असल्याचे समजते. पिता अद्याप फरार असल्यामुळे त्याने इतक्या टोकाचे पाऊल का उचलले हे अद्याप समजू शकलेले नाही.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, बुधवारी दुपारी वाघोली येथे वडिलांनी 15 वर्षीय पोटच्या मुलीला अतिशय निर्घूणपणे कुऱ्हाडीने डोक्यावर, हातावर आणि पायावरही सपासप वार करीत संपवले. अक्षदा फकीरा दुपारगुडे असे मृत मुलीचे नाव आहे. तिचा आवाज ऐकून बाजूचे लोक धावत आले. त्यांनी तातडीने पोलिसांना माहिती दिली. पण, पोलिस घटनास्थळी पोहोचेपर्यंत आरोपी बाप फरार झाला होता. तिला उपचारासाठी ससून रुग्णालयात नेत असतानाच तिचा मृत्यू झाला, अशी माहिती लोणीकंद पोलिसांनी दिली आहे. मूळचे सोलापूर येथील दुपारगुडे कुटंब सध्या वाघोली येथे राहते. पित्याने केलेल्या हल्ल्यात मुलगी जखमी झाली होती.

याबद्दल पीडित मुलीच्या मावशीच्या पतीच्या फिर्यादीवरून लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस फरार बापाचा शोध घेत असल्याची माहिती आहे. वाघोली परिसरात या खूनामुळे खळबळ उडाली आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in