

पुणे : पुणे महानगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी आता खऱ्या अर्थाने सुरू झाली असून, राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे. एकीकडे भारतीय जनता पक्षाने आपल्या उमेदवारांची चाचपणी पूर्ण केली असतानाच, दुसरीकडे केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या संभाव्य युतीवर केलेल्या भाष्यानंतर ‘भाजपच्या विरोधात सर्वजण एकत्र येत आहेत. पैलवान मजबूत आणि ताकदवान आहे, म्हणून सर्व छोटे पैलवान एकत्र येत आहेत, या बोचऱ्या टीकेमुळे पुण्यात आता ‘दादा विरुद्ध अण्णा’ (अजित पवार विरुद्ध मुरलीधर मोहोळ) असा नवा संघर्ष पेटण्याची चिन्हे आहेत.
पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी दोन्ही राष्ट्रवादी पक्ष एकत्र येण्याच्या चर्चांवर भाष्य करताना मुरलीधर मोहोळ यांनी विरोधकांची खिल्ली उडवली. ‘भाजपच्या विरोधात सर्वजण एकत्र येत आहेत. पैलवान मजबूत आणि ताकदवान आहे, म्हणून सर्व छोटे पैलवान एकत्र येत आहेत,’ अशा शेलक्या शब्दांत त्यांनी टोला लगावला. मोहोळ यांनी अजित पवारांसह इतर नेत्यांना प्रत्यक्षपणे ‘छोटे पैलवान’ संबोधल्यामुळे पुण्याच्या राजकारणात नव्या वादाला तोंड फुटले आहे.
भाजपच्या ४० ते ४५ नगरसेवकांचे तिकीट धोक्यात?
पुणे महापालिकेसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली असून भाजपच्या कोअर कमिटीची नुकतीच आपटे रस्त्यावरील एका हॉटेलमध्ये महत्त्वाची बैठक पार पडली. यात पुण्यातील सहा आमदारांशी चर्चा करून प्रत्येक प्रभागातून चार नावांची शिफारस मागवली आहे. मात्र, भाजपमध्ये झालेल्या 'जम्बो' पक्षप्रवेशांमुळे निष्ठावान कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, भाजपच्या ९९ माजी नगरसेवकांपैकी जवळपास ४० ते ४५ नगरसेवकांची उमेदवारी धोक्यात असून, कसबा, कोथरूड आणि खडकवासला यांसारख्या मतदारसंघात नवीन चेहरे दिले जाण्याची दाट शक्यता आहे.
अंतिम निर्णय देवेंद्र फडणवीसांच्या कोर्टात
भाजपच्या या बैठकीत संभाव्य उमेदवारांची यादी तयार करण्यात आली असली तरी, त्यावर अंतिम शिक्कामोर्तब मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करणार आहेत. यासाठी मुंबईत आज (गुरुवारी) बैठक होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. या बैठकीत शिवसेनेला (शिंदे गट) आणि रिपाइंला किती जागा सोडायच्या, याचाही निर्णय घेतला जाईल. जर आमदारांनी सुचवलेली नावे पक्षाच्या अंतर्गत सर्वेक्षणात मागे पडली, तर कोअर कमिटीच्या शिफारशीनुसार उमेदवारी बदलली जाऊ शकते, ज्यामुळे उमेदवारी जाहीर होईपर्यंत सस्पेन्स कायम राहणार आहे.