

पुणे : पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराच्या विस्तार आणि स्थलांतराचा वाद आता चांगलाच पेटला आहे. मंदिराच्या विस्तारीकरणाचा मार्ग मोकळा करण्यासाठी हालचाली सुरू असतानाच, दुसरीकडे हिंदू महासभेने थेट मंदिरच इतरत्र स्थलांतरित करण्याची मागणी केली आहे.
या वादाची मुख्य पार्श्वभूमी अशी की, कसबा मतदारसंघाचे आमदार हेमंत रासने यांनी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराचा विस्तार करण्यासाठी लगतच्या फरासखाना पोलीस ठाण्याची जागा उपलब्ध करून देण्याबाबतचा प्रस्ताव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सादर केला होता. या प्रस्तावाला पुणे पोलिसांनी काही अटींसह तत्त्वतः 'ना हरकत' प्रमाणपत्र दिले असून या अटी मान्य करून पुढील निर्णयासाठी हा प्रस्ताव पुन्हा शासनाकडे पाठवण्यात आला आहे.
नियोजित आराखड्यानुसार, सध्याचे फरासखाना पोलीस ठाणे आणि इतर कार्यालये बुधवार पेठेतील दत्त मंदिराजवळील नऊ गुंठे जागेत उभारण्यात येणाऱ्या एका आधुनिक पोलीस संकुलात स्थलांतरित केले जाणार असून त्याचे बांधकाम पूर्ण झाल्यावरच पोलीस ठाण्याची सध्याची जागा मंदिराच्या विस्तारासाठी पूर्णपणे खुली केली जाईल. या प्रस्तावावर राज्य शासनाचा जो अंतिम निर्णय असेल, तो आपल्याला मान्य असेल, अशी भूमिका आमदार हेमंत रासने यांनी मांडली आहे. मात्र, मंदिराच्या या संभाव्य विस्तारीकरणाला हिंदू महासभेचे आनंद दवे यांनी तीव्र विरोध दर्शवला आहे. पुढील दहा वर्षांचा विचार न करता, १०० वर्षांचे दूरगामी नियोजन करणे अत्यंत आवश्यक असल्याचे त्यांनी म्हटले आहे.