पुणे : कोयत्याचा धाक दाखवून आणि तोडफोड करून वाघोली भागात दहशत माजवणाऱ्या चौघांना पोलीस उपायुक्त हिम्मत जाधव यांनी पुणे शहर, पिंपरी-चिंचवड आणि पुणे जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार केले आहे. रोहन ऊर्फ मोन्या रामप्यारे गिरी (२०), विकास राजू जाधव (२०), आदित्य दीपक कांबळे (१८), वैभव सुभाष पोळ (१८) अशी तडीपार केलेल्यांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी पुणे-अहिल्यानगर रोड, वाघोली, बकोरी फाटा, वाघोली बाजारतळ, तसेच आसपासच्या भागात दहशत माजवणे, गंभीर दुखापत करून तोडफोड करणे अशा स्वरूपाचे गुन्हे केले आहेत. हे गुंड नागरिकांना कायम दहशतीखाली ठेवून वारंवार त्रास देत होते. त्यामुळे स्थानिक लोक नेहमी दडपणाखाली वावरत होते. या गुंडांवर वचक बसावा, या उद्देशाने मिळालेल्या प्रस्तावानुसार उपायुक्त जाधव यांनी या टोळीला पुणे जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आले आहे.