दिंड्यांमधून घुमला विठुनामाचा गजर; पुण्यनगरी भक्तिरसात झाली चिंब

दिंड्या-दिंड्यांमधून घुमणारा विठुनामाचा गजर... अभंगांत रमलेले वारकरी... ज्ञानोबा-तुकोबांच्या दर्शनासाठी लागलेली भाविकांची रीघ... यामुळे अवघी पुण्यनगरी शनिवारी भक्तिरसात चिंब झाली.
दिंड्यांमधून घुमला विठुनामाचा गजर; पुण्यनगरी भक्तिरसात झाली चिंब
Published on

पुणे : दिंड्या-दिंड्यांमधून घुमणारा विठुनामाचा गजर... अभंगांत रमलेले वारकरी... ज्ञानोबा-तुकोबांच्या दर्शनासाठी लागलेली भाविकांची रीघ... यामुळे अवघी पुण्यनगरी शनिवारी भक्तिरसात चिंब झाली.

संत ज्ञानेश्वर माऊली व संत तुकाराम महाराज यांच्या पालख्यांचे शुक्रवारी शहरात आगमन झाले अन् ‘पुणेकरांनी आपली सेवा रूजू केली. सकाळपासूनच हजारो भाविकांची पावले दर्शनासाठी पालखी विठोबा मंदिर व निवडुंगा विठोबा मंदिराच्या दिशेने वळली होती. लांबच लांब रांगा लावत व माऊली-तुकोबांच्या पादुकांवर आपला माथा टेकवत पुणेकर भाविकांनी दर्शनाचा आनंद घेतला. मुक्कामाचा दिवस म्हणजे थोडाफार निवांतपणा आलाच. अनेक भाविकांनी पुण्यातील शनिवारवाडा, लाल महाल, दगडूशेठ हलवाई गणपती, सारसबाग, पर्वती, कात्रज उद्यान यांसह विविध ठिकाणे, धार्मिक स्थळे यांना भेट देत मुक्कामाचा दिवस सत्कारणी लावला.

निवांतपणाबरोबरच वारकरी बांधवांनी भक्तीचा जागरही घडविला. दिंड्या दिंड्यांत अभंगाचा नाद घुमू लागला. विठ्ठला नाम तुझे चांगले । ऐकता मन माझे रंगले ।। या विठुनामाच्या गजरात अवघे वैष्णव रमून गेले. शहरातील मठ, मंदिरे, मोकळ्या जागा सर्वत्रच हा सावळा, सुंदर विठ्ठल भरून राहिलेला. भजन, कीर्तनात, भक्तिरसात पुण्यनगरी न्हाऊन गेली. अवघा आसमंत विठुमय झाला. पुण्यातील नागरिकांनी या सोहळ्याचे मनोभावे आदरातिथ्य केले. पुण्यात वारकऱ्यांना ठिकठिकाणी अन्नदान करण्यात आले. तर कितीतरी पुणे भाविकांनी दिंड्यांमध्ये भोजनाचा आनंद घेऊन तृप्तीचा ढेकरही दिला. दुसऱ्या बाजूला पालखी सोहळ्याला विविध सेवासुविधा पुरविण्यात आल्या.

माऊलींची पालखी आज दिवे घाट मार्गावर

दरम्यान, माऊलींची पालखी रविवारी सासवडच्या दिशेने रवाना होणार आहे. दिवे घाटाचा अवघड टप्पा याच मार्गावर असून, २८ किमीचा हा टप्पा वारकरी हरिनामाच्या बळावर लीलया पार करतात. त्यामुळे यंदाही वारकऱ्यांना ओढ लागली आहे, ती दिवे घाटाची. दिवे घाटही माऊलींच्या स्वागतासाठी आतुर असेल. त्यामुळे पुणेकरांना या दोन्ही पालख्यांना भावपूर्ण निरोप द्यावा लागणार आहे.

दिवे घाट माथ्यावर जाण्यास मनाई

दरम्यान, दिवे घाटात रस्ता रुंदीकरणाचे काम सुरू असल्याने अपघाताचा धोका लक्षात घेऊन डोंगरमाथ्यावर भाविकांना प्रवेश बंदी घालण्यात आली आहे. घाटात डोंगरकड्यांवर खाचखळगे निर्माण झाले आहेत. निसरड्या वाटाही तयार झाल्या आहेत. त्यामुळे दरडी कोसळण्याची भीती आहे. मध्यंतरी मुसळधार पावसामुळे दिवे घाटात पाण्याचे प्रचंड लोंढे व त्यासोबत मातीही वाहून आल्याचे पहायला मिळाले होते. हे लक्षात घेऊन खबरदारी म्हणून माथ्यावर जाण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे.

फडणवीस यांनी घेतले पादुकांचं दर्शन

आषाढी पालखी सोहळ्यानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी रात्री पुणे इथल्या भवानी पेठेतील पालखी विठ्ठल मंदिरात संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या पादुकांचं दर्शन घेतलं. यावेळी त्यांच्या हस्ते मंदिरात पालखीची पूजा झाली.

पत्रकार-पोलिसांशी अरेरावी!

आळंदी संस्थानचे प्रमुख विश्वस्त श्री निरंजन नाथ उर्फ स्वप्नील कासेकर यांनी वारकऱ्यांसह माध्यमांचे प्रतिनिधी आणि पोलिस यांच्याशी अरेरावी आणि उद्धट वर्तन केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणाची संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा प्रमुख डॉ. भावार्थ देखणे यांनीही दाखल घेतली असून, दिलगिरी व्यक्त केली आहे. कुणी मुजोरी करत असेल, तर आम्ही त्याला त्यावेळीच समज देणार असल्याचे त्यांनी सांगितले.

logo
marathi.freepressjournal.in