
पुणे : पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात गर्भवती महिलेच्या मृत्यूनंतर आरोग्य विभाग आणि धर्मादाय सहआयुक्तांच्या उच्चस्तरीय समितीचा अहवाल सरकारला प्राप्त झाला आहे. डॉ. सुश्रूत घैसास हे दोषी असल्याचे प्रथमदर्शनी स्पष्ट झाले असून, त्यांच्याविरोधात कारवाई होण्याची शक्यता आहे.
दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात गर्भवती महिलेच्या मृत्यू प्रकरणात डॉ. सुश्रूत घैसास यांच्याविरोधात कारवाई होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. घैसास यांच्याविरोधात दोन दिवसांत कारवाईची शक्यता आहे, असे समजते. आरोग्य विभाग आणि धर्मदाय सहआयुक्तांच्या उच्चस्तरीय समितीचा अहवाल सरकारला प्राप्त झाला आहे. या प्रकरणात या समित्यांचे दोन्ही अहवाल सरकारकडे सोपवण्यात आले आहेत.
या दोन्ही अहवालांमध्ये डॉ. घैसास हे दोषी असल्याचे प्रथमदर्शनी स्पष्ट झाले आहे. त्यामुळे त्यांच्याविरोधात कारवाई होणार आहे. घैसास यांनी राजीनामा दिल्यानंतर आता शासनाकडून कारवाईची टांगती तलवार त्यांच्यावर आहे. गर्भवती महिलेच्या मृत्यूच्या घटनेनंतर दीनानाथ मंगेशकर रुग्णालय व्यवस्थापनाविरोधात संतापाची लाट पसरली आहे. विविध राजकीय पक्षांनी रुग्णालयाच्या कारभाराविरोधात आंदोलन केले होते. त्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी रुग्णालय परिसरात प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत. दीनानाथ हॉस्पिटल परिसरात रुग्णांच्या नातेवाइकांशिवाय इतर व्यक्तींना एकत्रित येण्यास मनाई करण्यात आली आहे.
महिला आयोगाकडून कारवाईचे आदेश
राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी याबाबत सांगितले की, “पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने तनिषा भिसे यांच्या मृत्यूनंतर केलेल्या अंतर्गत चौकशीचा अहवाल सार्वजनिक केला. मृत तनिषा आणि भिसे कुटुंबीयांची वैयक्तिक माहिती परवानगीविना सार्वजनिक केल्याने मानसिक त्रास झाल्याची तक्रार सविता भिसे यांनी राज्य महिला आयोगाकडे केली आहे. आयोगाने याप्रकरणी पुण्याचे पोलीस आयुक्त आणि महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलच्या अध्यक्षांना यावर तातडीने कारवाई करण्याचे निर्देश दिले असून आयोगास केलेल्या कार्यवाहीचा चौकशी अहवाल तत्काळ सादर करण्यास सांगितले आहे.”