

मुंबई : पुणे येथील नवले पुलावरील वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी सुमारे ६ हजार कोटी रुपये खर्चाच्या उन्नत मार्गाच्या प्रकल्पाचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आला आहे, अशी माहिती गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी मंगळवारी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली.
पुण्यातील स्वामीनारायण मंदिर ते नवले उड्डाणपुलाबाबत भाजपच्या भीमराव तापकीर यांनी आज प्रश्न विचारला होता. या प्रश्नाला उत्तर देताना कदम म्हणाले, संबंधित राष्ट्रीय महामार्गाचा सुमारे पाच ते सहा किलोमीटरचा भाग तांत्रिकदृष्ट्या संवेदनशील आहे. रस्त्याचा उतार अत्यंत तीव्र नसला तरी ग्रामीण भागातून शहराकडे येणाऱ्या जड वाहनांमुळे वाहतूक कोंडी होते. त्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढत असल्याचे निरीक्षण आहे. या पार्श्वभूमीवर, कायमस्वरूपी उपाय म्हणून उन्नत रस्ता उभारणे आवश्यक आहे.
केंद्र सरकारकडे पाठपुरावा सुरू
संबंधित ठिकाण अपघातप्रवण क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे. अपघात होऊ नयेत म्हणून रस्त्याची रुंदी ७ मीटरवरून १०.५ मीटरपर्यंत वाढवण्यात आली आहे तसेच वेगमर्यादा ६० किमी प्रतितासवरून ४० किमी करण्यात आली. वाहतूक पोलीस बंदोबस्त वाढवणे, स्वयंसेवकांची नियुक्ती तसेच जड वाहनांसाठी सकाळी ६ ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत वेळेची मर्यादा घालण्यात आली. या उन्नत मार्गासाठी केंद्राकडे पाठपुरावा सुरू असल्याचे ते म्हणाले.