पर्यावरणासाठी झगडणारं नेतृत्व गमावलं! प्रख्यात पर्यावरण शास्त्रज्ञ डॉ. माधवराव गाडगीळ यांचं निधन

पर्यावरण क्षेत्रात सामान्य माणूस केंद्रीभूत ठेवून निर्भीडपणे भूमिका मांडणारे, जागतिक कीर्तीचे प्रख्यात पर्यावरणशास्त्रज्ञ डॉ. माधवराव गाडगीळ यांचे दुःखद निधन झाले.
पर्यावरणासाठी झगडणारं नेतृत्व गमावलं! प्रख्यात पर्यावरण शास्त्रज्ञ डॉ. माधवराव गाडगीळ यांचं निधन
Published on

पर्यावरण क्षेत्रात सामान्य माणूस केंद्रीभूत ठेवून निर्भीडपणे भूमिका मांडणारे, जागतिक कीर्तीचे प्रख्यात पर्यावरणशास्त्रज्ञ डॉ. माधवराव गाडगीळ यांचे काल (दि.७) रात्री वयाच्या ८३ व्या वर्षी दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने पर्यावरणाप्रती कमालीची तळमळ असलेलं नेतृत्व गमावल्याची भावना सर्वच स्थरांतून व्यक्त होत आहे.

आजारपणामुळे गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर पुण्यातील डॉ. शिरीष प्रयाग हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. मात्र, रात्री ११ च्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. भारतात पर्यावरणवादाची बीजे रोवण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता. त्यांनी पश्चिम घाटातील जैव विविधता जपणे आणि पर्यावरण संवर्धनाबाबत भरीव योगदान दिले. निसर्गाचा ऱ्हास न करता शाश्वत विकास साधला पाहिजे, अशी भूमिका त्यांची होती. पर्यावरण संरक्षण हे केवळ धोरणांपुरते मर्यादित न ठेवता ते लोकचळवळ बनले पाहिजे, असा त्यांचा आग्रह होता. निसर्ग आणि विज्ञान यांचा मेळ घालून पर्यावरणाचे रक्षण कसे करावे, याचा वस्तुपाठ डॉ. माधव गाडगीळ यांनी घालून दिला.

अनेक पुरस्कारांनी सन्मान

२४ मे १९४२ रोजी पुण्यात जन्मलेल्या माधवरावांनी पुणे आणि मुंबई विद्यापीठातून जीवशास्त्रातील पदवी घेतली. नंतर हॉवर्डमधून त्यांनी मॅथेमॅटिकल इकॉलॉजी या विषयात त्यांनी पीएचडी केली. त्यांनी २२५ पेक्षा अधिक शोधनिबंध लिहिले असून सहा पुस्तकाचे ते लेखक आहेत. अनेक पुरस्कारांनी गाडगीळ यांना सन्मानित करण्यात आले. राष्ट्रपतींच्या हस्ते पद्मश्री आणि पद्मभूषण, आयसीएसआरतर्फे विक्रम साराभाई पुरस्कार, पर्यावरण संरक्षणासाठीचा प्यू (PEW) विद्वत्ता पुरस्कार, संयुक्त राष्ट्रांची पर्यावरण संस्था असलेल्या UNEP चा 'चॅम्पियन ऑफ अर्थ' जीवनगौरव हा मानाचा पुरस्कारही त्यांना मिळाला.

ऐतिहासिक गाडगीळ अहवाल

२०१० साली केंद्राने डॉ. गाडगीळ यांच्या अध्यक्षतेखाली पश्चिम घाटाच्या अभ्यासासाठी समिती नेमली होती. जैवविविधतेने नटलेल्या पश्चिम घाटात वाढता मानवी हस्तक्षेप, उत्खनन, मोठमोठे प्रकल्प आणि हवामान बदलांमुळे होणारे परिणाम यांचा सखोल अभ्यास करून हा अहवाल तयार केला होता. भूस्खलन दुर्घटनांची शक्यता आणि त्यावरच्या उपाययोजना सुचवल्या होत्या. ३१ ऑगस्ट २०११ रोजी समितीने शासनाला आपला अहवाल सादर केला होता. आहवालात पश्चिम घाटातील १ लाख २९ हजार ०३७ चौरस किलोमीटरचा पूर्ण परिसर पर्यावरणाच्या दृष्टीने संवेदनशील म्हणून जाहीर करण्याची शिफारस केली होती. त्यानंतर देशभरात विकास विरूद्ध पर्यावरणाचे रक्षण यावर तीव्र चर्चा झाली. काही शिफारशींना टोकाचा विरोधही झाला. त्यानंतर २०१३ मध्ये केंद्राने डॉ. कस्तुरीरंगन यांच्या अध्यक्षतेखाली दुसरी समिती बनवली आणि या समितीने आपल्या अहवालात गाडगीळ समितीच्या अनेक शिफारसी सौम्य केल्या. पण, आजही गाडगीळ यांचा अहवाल अभ्यासकांसाठी, पर्यावरणासाठी आणि पश्चिम घाटाच्या भवितव्याच्या दृष्टीने तितकाच महत्त्वाचा मानला जातो.

डॉ. माधवराव गाडगीळ यांचे पार्थिव अंतिम दर्शनासाठी त्यांच्या 'ए-१८, स्प्रिंग फ्लॉवर अपार्टमेंट, पंचवटी, पाषाण' या निवासस्थानी दुपारपर्यंत ठेवण्यात येणार आहे. दुपारी ४ वाजता पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

logo
marathi.freepressjournal.in