

पुणे : पुण्यातील लोहगाव परिसरात भारतीय हवाई दलाचा जवान असल्याचे भासवून वावरणाऱ्या एका तोतया व्यक्तीला लोहगाव पोलिसांनी सतर्कतेने कारवाई करत अटक केली आहे. शुभम विलास अंबुरे (२६) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
आरोपी शुभम अंबुरे याच्याकडून हवाई दलाचे बनावट ओळखपत्र आणि लष्करी गणवेश जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी लोहगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारतीय हवाई दलात कार्यरत असलेले जवान ब्रिजेशकुमार मिश्रा (४८) यांनी याबाबत पोलिसांत फिर्याद दिली आहे.
हवाई दलाच्या लष्करी अधिकाऱ्यांना लोहगाव परिसरात एक व्यक्ती जवानासारखा गणवेश परिधान करून संशयास्पदरीत्या फिरत असल्याची माहिती मिळाली होती. अधिकाऱ्यांनी सापळा रचून शुभम अंबुरे याला ताब्यात घेत पोलिसांच्या स्वाधीन केले. प्राथमिक चौकशीत आरोपीने लोहगाव येथील एका टेलरिंग दुकानातून हवाई दलाच्या गणवेशासारखा पोशाख शिवून घेतल्याचे तसेच बनावट ओळखपत्र तयार केल्याचे समोर आले आहे.