

मुंबई : रुग्णांना सुरक्षित, दर्जेदार आणि परिणामकारक औषधे उपलब्ध करून देण्याची जबाबदारी असलेल्या औषध उत्पादकांकडूनच रुग्णांच्या आरोग्याशी खेळ सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पुणे जिल्ह्यातील इंडुकेअर फार्मास्युटिकल अँड रिसर्च फाऊंडेशन या औषध उत्पादक कंपनीचे औषध उत्पादन परवाने अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) पुन्हा एकदा रद्द केले आहेत. आवश्यक उत्पादन परवानगी न घेताच कंपनीने नऊ औषधांचे उत्पादन आणि विक्री केल्याचे तपासणीत उघड झाले. धक्कादायक म्हणजे या सर्व नऊ औषधांचे नमुने शासकीय विश्लेषकांच्या तपासणीत अप्रमाणित, मिसब्रँडेड किंवा बनावट ठरले आहेत. यातील दोन औषधांमध्ये तर मूळ सक्रिय घटकच आढळून आलेला नाही. दरम्यान, पिंपरी-चिंचवड येथील वायसीएम रुग्णालयातून या कंपनीचा सुमारे १ कोटी ७२ लाख किमतीचा अप्रमाणित औषधसाठा जप्त करण्यात आला आहे.
एफडीएच्या २४ नोव्हेंबरच्या प्रसिद्धिपत्रकानुसार, पुणे जिल्ह्यातील जेजुरी, अतिरिक्त एमआयडीसी परिसरातील इंडुकेअर फार्मास्युटिकल अँड रिसर्च फाऊंडेशन या कंपनीला ६ फेब्रुवारी २०२४ रोजी औषध उत्पादनाचे परवाने देण्यात आले होते. मात्र, १४ आणि १५ जुलै २०२६ रोजी कंपनीच्या उत्पादन युनिटची तपासणी करण्यात आली असता उत्तम उत्पादन पद्धतीच्या (जीएमपी) २५ गंभीर त्रुटी आढळल्या. त्यानंतर ७ सप्टेंबर २०२६ रोजी कंपनीचे उत्पादन परवाने रद्द करण्यात आले होते. तरीही कंपनीच्या कामकाजातील गंभीर अनियमितता आणि विनापरवाना औषध उत्पादनाचे प्रकार समोर आल्याने प्रशासनाने पुन्हा कठोर कारवाई केली आहे. दरम्यान, १३ लाख गोळ्यांचे उत्पादन, नोंदींचा पत्ताच नसल्याचे समोर आले आहे.
दोन औषधांमध्ये सक्रिय घटकच नाहीत
कंपनीने उत्पादन परवानगी न घेता तयार केलेल्या नऊ औषधांच्या नमुन्यांची शासकीय विश्लेषकांकडून तपासणी करण्यात आली. त्यामध्ये 'Ibucare Plus' या औषधात इबुप्रोफेन हा सक्रिय घटकच आढळला नाही. तर 'Carevita-M' या औषधात व्हिटॅमिन बी समूह, व्हिटॅमिन सी, फॉलिक ॲसिड, नियासिनामाइड, कॅल्शियम पॅन्टोथेनेट आणि मॅग्नेशियम यापैकी एकही घटक आढळला नाही. त्यामुळे ही दोन्ही औषधे बनावट घोषित करण्यात आली.
चुकीचे लेबलिंग, त्रुटी
'Carezinc'मध्ये व्हिटॅमिन सीचे प्रमाण निर्धारित प्रमाणाच्या ७२.७३ टक्के आढळले. 'LDLR-5', 'DomiCare', 'Caremide', 'Carepanta D2', 'I-Sartan M' व 'Caresprin 75' या औषधांमध्येही सक्रिय घटकांचे प्रमाण कमी असणे, औषध विरघळण्याच्या चाचणीत अपयश, चुकीचे लेबलिंग आणि इतर गंभीर त्रुटी आढळल्या.