रविंद्र धंगेकरांनी सोडला काँग्रेसचा 'हात', शिवसेना शिंदे गटात करणार प्रवेश, म्हणाले - "सत्ता असल्याशिवाय...

महाराष्ट्रात काँग्रेसला मोठा धक्का बसला असून पुण्यातील कसबा विधानसभा मतदारसंघातील माजी आमदार रविंद्र धंगेकर यांनी अखेर काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आहे.
रविंद्र धंगेकरांनी सोडला काँग्रेसचा 'हात', शिवसेना शिंदे गटात करणार प्रवेश, म्हणाले - "सत्ता असल्याशिवाय...
Published on

महाराष्ट्रात काँग्रेसला मोठा धक्का बसला असून पुण्यातील कसबा विधानसभा मतदारसंघातील माजी आमदार रविंद्र धंगेकर यांनी अखेर काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आहे. गेल्या काही दिवसांपासून ते शिवसेना शिंदे गटात जाणार अशी चर्चा होती. अखेर आज त्यांनी पत्रकार परिषदेत काँग्रेसची साथ सोडल्याचे जाहीर केले आणि शिवसेनेत जाण्यावरही शिक्कामोर्तब केले.

पक्ष सोडताना दु:ख होत आहे, शेवटी मीही माणूस आहे, असेही त्यांनी म्हटले. आज संध्याकाळी उपमुख्यमंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे प्रमुख एकनाथ शिंदे यांच्यासोबत बैठक होणार असून त्यानंतर पुढील निर्णय घेतला जाणार आहे असे धंगेकर यांनी जाहीर केले.

सत्ता असल्याशिवाय सर्वसामान्यांना न्याय देऊ शकत-

कोणताही निर्णय घेणे प्रचंड कठीण असते. ज्या पक्षासोबत तुम्ही १०-१२ वर्षे काम करतात, त्याठिकाणी कौटुंबिक नाते निर्माण होत असते. लोकसभेच्या किंवा विधानसभेच्या निवडणुकीतही सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी प्रचंड मोठी ताकद मागे उभी केली होती. पराभव झाला ही बाब वेगळी, पण सर्वानीच आपल्यावर खूप प्रेम केलं. त्यामुळे पक्ष सोडताना दुःख होतंय, शेवटी आपण माणूस आहोत. मी माझ्या मतदारांशी चर्चा केली. कार्यकर्तेही काही दिवसांपासून ऐकत नव्हते. त्यांचं म्हणणं होतं की आता आमची कामं कोण करणार? आणि लोकशाहीमध्ये सत्ता असल्याशिवाय सर्वसामान्यांना आपण न्याय देऊ शकत नाही किंवा कामे करु शकत नाही. अशावेळेस कामानिमित्त एक-दोन वेळेस एकनाथ शिंदेंना भेटलो होतो. उदय सामंत यांच्याशीही बोलत होतो. त्यांनी एकदा आमच्यासोबत काम करा असं सांगितलं होतं. नंतर धंगेकर शिवसेनेच्या वाटेवर असल्याच्या बातम्या टीव्ही चॅनलवर आल्या होत्या. त्यानंतर वर्षानूवर्ष ज्या भागात काम करतोय तिथल्या नागरिकांशी चर्चा केल्यावर असं लक्षात आलं की सत्ता असल्याशिवाय काम होत नाही. मध्यंतरी शिंदेंनी मी काँग्रेसचा आमदार असतानाही काही कामांमध्ये सहकार्य करत मदत केली होती. मी माझ्या मतदारांशी आणि सर्व कार्यकर्त्यांशी चर्चा करत हा निर्णय घेतला आहे, असे धंगेकर यांनी सांगितले.

logo
marathi.freepressjournal.in