

पुणे : पुण्यातील वाहतूककोंडी फोडण्यासाठी आणि सार्वजनिक वाहतुकीला चालना देण्यासाठी मोफत मेट्रो आणि बस प्रवासाचे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिले.
आगामी पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचा संयुक्त जाहीरनामा प्रसिद्ध केला. यावेळी खासदार सुप्रिया सुळे, दोन्ही राष्ट्रवादी पक्षाचे नेते आणि पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी बोलताना अजित पवार यांनी पुणेकरांच्या जीवनमानावर थेट परिणाम करणाऱ्या अनेक धाडसी घोषणा केल्या.
पवार म्हणाले, मोफत मेट्रो आणि बस प्रवास या योजनेसाठी महापालिकेला दरमहा २० कोटी म्हणजेच वर्षाला साधारण ३०० कोटी रुपये खर्च करावे लागतील. सध्या पुणेकरांचे वाहतुकीमुळे सुमारे १०,८०० कोटी रुपये वाया जात असताना, केवळ ३०० कोटींच्या तरतुदीतून संपूर्ण शहराला मोफत प्रवासाची सुविधा देणे शक्य आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या निर्णयामुळे रस्त्यांवरील खासगी वाहनांची संख्या कमी होऊन वाहतूककोंडी सुटेल आणि वायू प्रदूषणातही लक्षणीय घट होईल, असेही त्यांनी नमूद केले.
शिक्षणाच्या क्षेत्रात पुण्याला आधुनिक शहर बनवण्यासाठी महापालिकेच्या शाळांमधील प्रत्येक विद्यार्थ्याला टॅबलेट देण्याचा निर्णय या जाहीरनाम्यात घेण्यात आला आहे. सध्या ९० टक्के विद्यार्थ्यांचा कल ऑनलाइन शिक्षणाकडे असून हार्वर्ड आणि स्टॅनफोर्डसारख्या जागतिक दर्जाच्या संस्थांचे अभ्यासक्रम आता घरबसल्या उपलब्ध आहेत. शिक्षणातील ही आधुनिकता महापालिकेच्या शाळेत शिकणाऱ्या गरीब आणि झोपडपट्टीतील मुलांपर्यंत पोहोचावी, हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. अनेक पालकांना आर्थिक परिस्थितीमुळे ही साधने विकत घेणे परवडत नाही. त्यामुळे महापालिकेच्या माध्यमातून ही मदत केली जाणार आहे.
पुणे महानगरपालिकेचा १२,६०० कोटी रुपयांचा अर्थसंकल्प पाहता, प्रशासनातील गळती रोखून आणि कामात पारदर्शकता आणल्यास या सर्व योजनांसाठी निधीची कमतरता भासणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली.
ज्याप्रमाणे विधानसभा निवडणुकीत लाडक्या बहिणींनी आणि शेतकऱ्यांनी 'घड्याळ' चिन्हावर विश्वास दाखवला, तसाच विश्वास पुणेकरांनी आगामी निवडणुकीत 'घड्याळ आणि तुतारी'च्या उमेदवारांवर दाखवावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. हा जाहीरनामा म्हणजे केवळ निवडणुकीचे आश्वासन नसून, पुणेकरांच्या कल्याणासाठी पुढील पाच वर्षे रात्रंदिवस काम करण्याची ही शपथ असल्याचे अजित पवारांनी सांगितले.
महिलांना ५ लाख रुपयांपर्यंतचे व्याजमुक्त कर्ज
महिला सक्षमीकरणासाठी 'लाडकी बहीण' योजनेच्या धर्तीवर एक महत्त्वपूर्ण घोषणा करण्यात आली आहे. महापालिकेचे मोफत कौशल्य विकास प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी किंवा वाढवण्यासाठी ५ लाख रुपयांपर्यंतचे व्याजमुक्त कर्ज उपलब्ध करून दिले जाईल. या कर्जावरील पाच वर्षांचे व्याज महापालिका स्वतः भरणार आहे, असेही पवारांनी स्पष्ट केले.