पुण्यात तब्बल ३३ तास ३३ मिनिटे गणपती विसर्जन मिरवणूक

आकर्षक रथ, नेत्रदीपक विद्युत रोषणाई, ढोल-ताशांचा गजर, त्यावर डोलणारे कार्यकर्ते आणि 'गणपती बाप्पा मोरया'च्या जयघोषात पुण्याच्या गणेश विसर्जन मिरवणुकीची तब्बल ३३ तास ३३ मिनिटांनी सांगता झाली.
पुण्यात तब्बल ३३ तास ३३ मिनिटे गणपती विसर्जन मिरवणूक
पुण्यात तब्बल ३३ तास ३३ मिनिटे गणपती विसर्जन मिरवणूक
Published on: 

पुणे: आकर्षक रथ, नेत्रदीपक विद्युत रोषणाई, ढोल-ताशांचा गजर, त्यावर डोलणारे कार्यकर्ते आणि 'गणपती बाप्पा मोरया'च्या जयघोषात पुण्याच्या गणेश विसर्जन मिरवणुकीची तब्बल ३३ तास ३३ मिनिटांनी सांगता झाली. शुक्रवारी सकाळी ९.३० वाजता सुरू झालेली मिरवणूक शनिवारी सायंकाळी ६.१५ वाजता संपली. अपवाद वगळता मिरवणूक शांततेत पार पडली. मागील किरकोळ वर्षीच्या तुलनेत यंदा मिरवणूक एक तास नऊ मिनिटे आधी संपली.

मानाचा पहिला कसबा गणपती सकाळी ९.३० वाजता मिरवणुकीत सहभागी झाला. पर्यावरणपूरक 'हरित रथा'तून पर्यावरणसंवर्धनाचा संदेश देण्यात आला. रमणबाग युवा मंच, परशुराम आणि उद्गर्जना ढोल-ताशा पथकांच्या वादनाने लक्ष्मी रस्ता दुमदुमून गेला. सायंकाळी ४.४० वाजता कसबा गणपतीचे पांचाळेश्वर घाटावर विसर्जन झाले. त्यानंतर मानाचा दुसरा तांबडी जोगेश्वरी गणपती, तिसरा गुरुजी तालीम गणपती, चौथा तुळशीबाग गणपती आणि पाचवा केसरीवाडा गणपती मिरवणुकीत सहभागी झाले. या गणपतींचे अनुक्रमे सायंकाळी ५.०२, ५.०५, ५.३४ आणि ६.१२ वाजता विसर्जन झाले.

ध्वनिप्रदूषणाची पातळी १०४.५ डेसिबल

गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी प्रसिद्ध लक्ष्मी रस्त्यावर यंदा ध्वनी प्रदूषणाची पातळी मोठ्या प्रमाणात वाढल्याचे सीओईपी तंत्रशास्त्र विद्यापीठाच्या पाहणी अहवालातून समोर आले आहे. २०२६ मधील मिरवणुकीदरम्यान प्रमुख चौकांमध्ये सरासरी १०४.५ डेसिबल ध्वनी पातळी नोंदविण्यात आली. २०२५ मध्ये ही पातळी ९२.६ डेसिबल होती. विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी दहा प्रमुख चौकांमध्ये ध्वनिमापक उपकरणांच्या साहाय्याने नोंदी घेतल्या. होळकर चौकात सर्वाधिक १०६.८ डेसिबल, तर शेडगे चौकात १०६.३ आणि टिळक चौकात १०५.५ डेसिबल आवाज नोंदला गेला. दुपारी ४ वाजता सरासरी ध्वनी पातळी ११३.४ डेसिबल, तर मध्यरात्री १२ वाजता ११२.६ डेसिबल होती. त्यामुळे वाढत्या ध्वनिप्रदूषणाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

दगडूशेठच्या रथाने वेधले लक्ष

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या मिरवणुकीने पुणेकरांचे विशेष लक्ष वेधून घेतले. 'श्री वक्रतुंड रथा 'वरील आकर्षक रोषणाई, स्वरूपवर्धिनीचे पथक, प्रभात व दरबार बँड तसेच केरळच्या चेंदा मेलम पथकामुळे मिरवणुकीत उत्साह संचारला. 'मानवसेवा रथा'तून अमली पदार्थमुक्त भारताचा संदेश देण्यात आला. शुक्रवारी रात्री ८.२५ वाजता पांचाळेश्वर घाटावरील हौदात दगडूशेठ गणपतीचे विसर्जन करण्यात आले.

सकाळनंतर डीजेचा दणदणाट

मिरवणुकीच्या रात्रीच्या टप्प्यात डीजेचा आवाज तुलनेने कमी राहिला. मात्र, शनिवारी सकाळनंतर काही मंडळांनी डीजेच्या दणदणाटात मिरवणुका काढल्याने कर्णकर्कश आवाजाचा त्रास पुणेकरांना सहन करावा लागला. महाराष्ट्र तरुण मंडळाचा गणपती शनिवारी सायंकाळी ६.१५ वाजता मार्गस्थ झाल्यानंतर मिरवणुकीची अधिकृत सांगता झाली.

(संबंधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in