
पुणे : यंदाच्या गणेशोत्सवातील विसर्जन मिरवणुकीत अखिल मंडई मंडळ आणि श्रीमंत भाऊसाहेब रंगारी मंडळ लवकर सहभागी होणार आहेत. टिळक पुतळा चौकातून मानाचे पाच गणपती मार्गस्थ झाल्यानंतरच हे दोन्ही मंडळ मिरवणुकीत सामील होणार असून, रविवार, ७ सप्टेंबर रोजी येणाऱ्या खग्रास चंद्रग्रहणामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे मंडळांनी स्पष्ट केले.
गुरुवारी आयोजित पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली. अखिल मंडई मंडळाचे अध्यक्ष अण्णा थोरात म्हणाले की, गणेशोत्सव हा धार्मिक आणि श्रद्धेचा उत्सव आहे. अनंत चतुर्दशीला विसर्जन मिरवणुकीचे विशेष महत्त्व असते. यंदा विसर्जनाच्या दुसऱ्या दिवशी (७ सप्टेंबर) दुपारी १२ वाजून ३७ मिनिटांनी खग्रास चंद्रग्रहण सुरू होत असल्याने, त्याआधीच सर्व मूर्ती मंदिरात पोहोचणे आवश्यक आहे. यंदा गणेश विसर्जन मिरवणूक अनंत चतुर्दशी ६ सप्टेंबर रोजी पार पडणार असून, दुसऱ्या दिवशी होणाऱ्या खग्रास चंद्रग्रहणामुळे मिरवणूक वेळेत आणि सुरळीत पार पडावी, यासाठी सर्व मंडळांनी वेळेचे नियोजन ठेवावे, असे आवाहन अखिल मंडई आणि भाऊसाहेब रंगारी मंडळांनी केले आहे.
ग्रहणाच्या आधी मूर्ती परत मंदिरात पोहोचवण्यासाठी वेळेचे काटेकोर नियोजन गरजेचे आहे. टिळक पुतळ्यापासून मानाचे पाच गणपती मार्गस्थ झाल्यानंतर आम्ही तातडीने मिरवणुकीत सहभागी होऊ. सर्व मंडळांनी वेळेचे भान ठेवून सहकार्य केल्यास प्रशासनावरचा भार कमी होईल. - पुनीत बालन, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी मंडळ
काही नियमांमुळे पोलीस प्रशासनावर नाराजी आहे. गेल्या तीन वर्षांत सायंकाळी ७ वाजेपर्यंत आरती करून मिरवणुकीत सामील होण्यासाठी आम्ही तयार होतो. मात्र वेळेवर संधी न दिल्यामुळे आमचा सहभाग उशिरा झाला. यंदा ग्रहणकाळ लक्षात घेता मिरवणूक दुपारी १२ पूर्वी संपवण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. - अण्णा थोरात, अध्यक्ष अखिल मंडई मंडळ