'डीजे'विरोधात जनआक्रोश; हजारो पुणेकर रस्त्यावर; विद्यानंद बापटांच्या भूमिकेला दिला जाहीर पाठिंबा

गणेशोत्सवातील ‘डीजे’चा वाढता दणदणाट, कानठळ्या बसवणारा आवाज आणि लेझर किरणांच्या अतिवापरामुळे सर्वसामान्य नागरिकांना होणाऱ्या असह्य त्रासाविरोधात पुण्यात रविवारी उस्फूर्त जनआक्रोश पाहायला मिळाला.
'डीजे'विरोधात जनआक्रोश; हजारो पुणेकर रस्त्यावर; विद्यानंद बापटांच्या भूमिकेला दिला जाहीर पाठिंबा
'डीजे'विरोधात जनआक्रोश; हजारो पुणेकर रस्त्यावर; विद्यानंद बापटांच्या भूमिकेला दिला जाहीर पाठिंबा Anand Chaini
Published on

पुणे : गणेशोत्सवातील ‘डीजे’चा वाढता दणदणाट, कानठळ्या बसवणारा आवाज आणि लेझर किरणांच्या अतिवापरामुळे सर्वसामान्य नागरिकांना होणाऱ्या असह्य त्रासाविरोधात पुण्यात रविवारी उस्फूर्त जनआक्रोश पाहायला मिळाला. पुणे महानगरपालिकेच्या बैठकीत डीजेविरोधात धाडसी आणि रोखठोक भूमिका मांडणारे विद्यानंद बापट यांच्या समर्थनासाठी हजारो पुणेकर बालगंधर्व चौकामध्ये एकत्र आले आणि तेथून पुणे महानगरपालिकेपर्यंत एक विराट मोर्चा काढण्यात आला. ‘नागपुरात कायद्याला मान, सोलापूरला परंपरेचे भान, मग पुण्यातच लाऊडस्पीकरला का मोकळे रान?’ अशा तीव्र घोषणा देत पुणेकरांनी आपला संताप व्यक्त केला.

'पुणेकर अगेन्स्ट लाऊडस्पीकर' मंचाच्या वतीने या भव्य निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. हा मोर्चा कोणत्याही राजकीय दबावाशिवाय केवळ पुणेकरांच्या मनातील खदखद आणि त्रासामुळे अत्यंत उस्फूर्तपणे रस्त्यावर उतरला होता. या आंदोलनात ज्येष्ठ पत्रकार, निवृत्त वरिष्ठ पोलीस अधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, महिला, ज्येष्ठ नागरि, डॉक्टर आणि पर्यावरणप्रेमी आणि मोठ्या संख्येने तरुण वर्ग म्हणजेच ‘जेन झी’ (Gen Z) व मिलेनियल्स सहभागी झाले होते.

उत्सवाला आलेय बटबटीत स्वरूप

या आंदोलनात सहभागी झालेले जेष्ठ पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते विनय हर्डीकर यांनी आंदोलनकर्त्यांचे जाहीर कौतुक करत सांगितले की, गेली ३० वर्षे ते सामान्य आणि मध्यम वर्गाने नागरी प्रश्नांसाठी रस्त्यावर यावे म्हणून प्रयत्न करत होते, जे आज साध्य होताना दिसत आहे. त्यांच्या मते, पुण्यात गणेशोत्सव आणि मिरवणुका नक्कीच झाल्या पाहिजेत, परंतु गेल्या २० ते २५ वर्षांत या उत्सवाला अत्यंत बटबटीत स्वरूप आले असून केवळ लायटिंग, मोठमोठे आवाज आणि प्रचंड गोंगाट उरला आहे. या अतिगर्दीमुळे लोकांना वेळेत उपचार न मिळाल्याने आणि डीजेच्या धक्क्यामुळे अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. दिल्लीत ज्याप्रमाणे 'कॉक्रोच जनता पार्टी'च्या आंदोलनात मुलांच्या नोकऱ्यांच्या काळजीपोटी पालक रस्त्यावर आले, तसेच मुंबई व इतर शहरांमध्ये घडले, तसाच प्रकार आता पुण्यात होत असून आपल्या शहराचे आणि मुलाबाळांचे भविष्य निरोगी राहावे यासाठी सामान्य पुणेकरांना रस्त्यावर उतरावे लागले आहे, कारण हा त्रास आता असह्य झाला आहे.

आनंद शेजाऱ्याला दुःखी करणारा नसावा...

माजी वरिष्ठ पोलीस अधिकारी अशोक धिवरे यांनी निवृत्तीनंतर समाजात राहताना सामान्य लोकांना होणाऱ्या त्रासाची तीव्रता अधिक जवळून अनुभवल्याचे सांगितले. ते म्हणाले की, हा उत्सव आनंदाने साजरा झालाच पाहिजे, परंतु आपला आनंद शेजाऱ्याला दुःखी करणारा नसावा. सण साजरा करताना कोणालाही धार्मिक, भावनिक किंवा सांस्कृतिक दृष्ट्या त्रास होणार नाही याची काळजी मंडळाचे प्रतिनिधी, अध्यक्ष आणि पक्षाच्या प्रमुखांनी स्वतःला विचारून घेतली पाहिजे. धिवरे यांनी पूर्वीच्या परंपरांचा दाखला देत स्पष्ट केले की, नाचताना पदलालित्य असले पाहिजे आणि गुलालाऐवजी अष्टगंध लावण्याची आपली जी चांगली परंपरा आहे, तिच्याकडे आपण वळले पाहिजे, तर चुकीच्या परंपरांना निरोप दिला पाहिजे.

उत्सव, जयंत्या व्हाव्यात मोकळ्या मैदानांत

४० वर्षे पत्रकारिता करणारे ज्येष्ठ पत्रकार आनंद आगाशे यांनी स्पष्ट केले की, दरवर्षी आवाजाच्या मर्यादांची ही 'न्यू नॉर्मल' रेषा पुढे ढकलली जात आहे. संपूर्ण ताण केवळ पोलीस यंत्रणेवर टाकणे अन्यायकारक आणि अव्यवहार्य आहे. सत्तेत आणि विरोधात असणाऱ्या राजकीय नेतृत्वाने व सरकारने यावर अंतिम तोडगा काढणे गरजेचे आहे. आगाशे यांनी महत्त्वाचा तोडगा सुचवताना सांगितले की, रस्ते हे प्रामुख्याने वाहतुकीसाठी आहेत, त्यामुळे वाहतुकीला अडथळा ठरणारे वर्षभरातील सर्व उत्सव, मिरवणुका आणि जयंत्या रस्त्यांवरून हटवून मोकळ्या मैदानांमध्ये आयोजित केल्या पाहिजेत, जेणेकरून उर्वरित समाजाला कोणताही उपद्रव होणार नाही.

वाजामुळे रक्तदाब वाढतो...

‘डीजे’च्या आवाजामुळे हृदय धडधडते, कानाला त्रास होतो, मुले शाळेत जाऊ शकत नाहीत आणि लोक दुकाने उघडू शकत नाहीत, असे ७४ वर्षांच्या एका ज्येष्ठाने सांगितले. तर ७२ वर्षांच्या एका वृद्ध महिलेने सांगितले की, सणाच्या नावाखाली लोक आम्हाला घर सोडून बाहेर जाण्यास सांगतात, परंतु आम्ही घर सोडून कुठे जाणार? या आवाजामुळे रक्तदाब वाढतो आणि प्रचंड त्रास होतो.

मोबाईल ॲप्सवरचा डेसिबलचा आकडा खोटा...

ध्वनी क्षेत्रातील १५ वर्षांचा दांडगा अनुभव असणारे आणि ऑडिओ रेकॉर्डिंग स्टुडिओ चालवणारे एक तज्ज्ञ नागरिक या मोर्चात सामील झाले होते. त्यांच्याकडे शासकीय प्रमाणपत्र असून त्यांनी सांगितले की, सध्या मोबाईल ॲप्सवर दाखवला जाणारा डेसिबलचा आकडा पूर्णपणे खोटा असतो, कारण लाऊडस्पीकर नसतानाही आजूबाजूचा नेहमीचा आवाज ९० डेसिबलच्या आसपास असतो. पोलिसांनी कशाच्या आधारे परवानगी दिली हे समजत नाही, कारण ६० डेसिबलचा नियम लाऊडस्पीकर सुरू असताना पाळला जाणे कधीही शक्य नाही. त्यांनी वैज्ञानिक माहिती देत स्पष्ट केले की, माणसाला होणारा त्रास हाय फ्रिक्वेन्सीचा नसून कमी वारंवारतेच्या ६० हर्ट्झ ते २०० हर्ट्झ असणाऱ्या 'लो फ्रिक्वेन्सी बेस'चा असतो. हा बेस सेकंदाला ३४० मीटर वेगाने आणि २० फूट उंचीच्या हवेच्या लाटेसारखा थेट छाताडावर आदळतो, ज्यामुळे हृदय धडधडू लागते. या तज्ज्ञाने यापूर्वी डीजेच्या विरोधात भूमिका घेतली म्हणून त्यांना अनेक कार्यकर्त्यांकडून धमक्याही आल्याचे त्यांनी उघड केले.

‘ जेन झी’, ‘मिलेनियल्स’चा उस्फूर्त सहभाग

या मोर्चामध्ये जेन झी (Gen Z) आणि ‘मिलेनियल्स’ पिढीचा उस्फूर्त सहभाग होता. डीजेच्या तालावर केवळ तरुण नाचतात असा चुकीचा समज मोडून काढत, या तरुणांनी ‘डीजे’ बंदीची मागणी केली. एका तरुण मानसोपचार अभ्यासकाने सांगितले की, ‘डीजे’च्या अवाढव्य आवाजामुळे लोकांमध्ये नैराश्य आणि तीव्र चिंता वाढून मानसिक अस्वस्थता निर्माण होते. कसबा गणपतीच्या अगदी पाठीमागे राहणाऱ्या एका तरुणाने सांगितले की, २०१४-१५ पर्यंत उत्सव सहन करण्याच्या मर्यादेत होता, पण आता गणेशोत्सव जवळ आला की घरच्यांच्या अंगावर काटा येतो. घरात ८० ते ९० वर्षांचे वृद्ध आजी-आजोबा असल्याने त्यांना एकटे सोडून बाहेरही जाता येत नाही, आणि आवाजाच्या तीव्रतेने घरातील काचा थरथरतात. तरुणांनी अशा चुकीच्या गोष्टींना 'संस्कृती किंवा धर्मविरोधी' ठरवणाऱ्या नरेटिव्हवर तीव्र आक्षेप घेतला आणि सांगितले की, डीजेला विरोध म्हणजे संस्कृतीला किंवा सणाला विरोध नव्हे. तरुणांनी 'कन्सेंट'चा मुद्दा मांडताना सांगितले की, हेडफोन वापरताना आम्हाला ऐकण्याची आणि न ऐकण्याची स्वतःची मर्जी असते, परंतु डीजेमुळे विसर्जनाच्या वेळी तब्बल ४० तास घरात कोंडून राहावे लागते. हा जबरदस्तीने लादलेला आवाज आहे.

मंडप, ढोल-ताशांमुळे प्रचंड वाहतूक कोंडी

पुण्यामध्ये सध्या सुरू असलेल्या ‘मेट्रो’च्या कामामुळे रस्ते आधीच अरुंद झाले असून त्यात ठिकठिकाणी उभारलेले मंडप आणि ढोल-ताशांच्या वादनामुळे प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण होते. या सर्व गोष्टींवर प्रशासनाने गांभीर्याने विचार करणे गरजेचे आहे. नागरिकांनी सरकारकडे मागणी केली आहे की, ज्याप्रमाणे विविध कामांसाठी परवानग्या मागितल्या जातात, त्याच धर्तीवर ज्या सोसायट्या किंवा भागात मंडळे मोठा आवाज आणि लेझरचा वापर करतात, तिथे परिसरातील नागरिकांची व रहिवासी सोसायट्यांची ना-हरकत प्रमाणपत्र सक्तीची करावी. दोन-चार कार्यकर्त्यांनी ठरवलेले निर्णय इतर नागरिकांच्या माथी मारणे चुकीचे असून, सणांचा राजा असणारा हा उत्सव सामान्य जनतेला अडचण निर्माण न करता पूर्वीसारखाच साध्या आणि देखण्या पद्धतीने साजरा व्हावा, अशी आग्रही मागणी या जनआक्रोश मोर्चाद्वारे पुणेकरांनी सरकार आणि न्यायालयाकडे केली.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in