पुणे जर्मन बेकरी बॉम्बस्फोट प्रकरण: आरोपी मिर्झा बेगला १३ वर्षांनंतर जामीन

पुण्यातील कोरेगाव पार्कमधील जर्मन बेकरी या लोकप्रिय भोजनालयात १३ फेब्रुवारी २०१० रोजी झालेल्या स्फोटात पाच परदेशी नागरिकांसह १७ जणांचा मृत्यू झाला
पुणे जर्मन बेकरी बॉम्बस्फोट प्रकरण: आरोपी मिर्झा बेगला १३ वर्षांनंतर जामीन
Published on

मुंबई : पुणेसह संपूर्ण महाराष्ट्राला हादरा देणाऱ्या पुणे जर्मन बेकरी बॉम्बस्फोटप्रकरणी दोषी ठरविण्यात आलेला प्रमुख आरोपी मिर्झा हिमायत बेगला उच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला. न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे आणि न्यायमूर्ती गौरी गोडसे यांच्या खंडपीठाने मिर्झा याला १३ वर्षांनंतर सशर्त जामीन मंजूर केला.

पुण्यातील कोरेगाव पार्कमधील जर्मन बेकरी या लोकप्रिय भोजनालयात १३ फेब्रुवारी २०१० रोजी झालेल्या स्फोटात पाच परदेशी नागरिकांसह १७ जणांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने ७ सप्टेंबर २०१० रोजी बेगला अटक केली. एटीएसने बेगच्या उदगीर येथील घरातून सुमारे १.२ किलोग्रॅम आरडीएक्स जप्त केले होते. पुणे सत्र न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळल्यानंतर बेगने उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते. त्याच्या अपिलावर न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे आणि न्यायमूर्ती गौरी गोडसे यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाल्यानंतर खंडपीठाने निर्णय राखून ठेवला होता. शुक्रवारी तो निर्णय जाहीर करीत खंडपीठाने बेगला १ लाख रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्याचा सशर्त जामीन मंजूर केला. बेगने प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या शनिवारी एटीएसच्या नाशिक कार्यालयात हजेरी लावावी तसेच नाशिक येथील कनिष्ठ न्यायालयाच्या हद्दीबाहेर जाऊ नये, अशी अट उच्च न्यायालयाने घातली आहे. पुणे जर्मन बेकरी बॉम्बस्फोट प्रकरण

logo
marathi.freepressjournal.in