नवी मुंबई : पुण्यातील बाणेर भागात राहणाऱ्या एका २२ वर्षीय तरुणाने त्याच भागात राहणाऱ्या एका १७ वर्षीय तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. त्यानंतर तरुणी गरोदर राहिल्याने तिच्या आईने तिला गर्भपातासाठी नेरूळ येथील महापालिकेच्या रुग्णालयात आणल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. नेरूळ पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन पीडित तरुणीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या आकाश चव्हाण (२२) याच्याविरुद्ध बलात्कारासह पोक्सो कलमाखाली गुन्हा दाखल करून सदरचा गुन्हा पुढील तपासासाठी पुण्यातील म्हाळुंगे पोलिसांकडे वर्ग केला आहे.
या घटनेतील पीडित तरुणी ही पुण्यात आईवडिलांसह राहण्यास असून तिच्यावर लैंगिक अत्याचार करणारा आरोपी आकाश चव्हाण देखील त्याच भागात राहण्यास आहे. आरोपी आकाश चव्हाणने पीडित तरुणीसोबत ओळख वाढवून तिच्यासोबत मैत्री केली. पीडित तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. त्यामुळे पीडित तरुणी गरोदर राहिल्यानंतर याबाबत आपली मुलगी गरोदर राहिल्याची बाब इतरांना समजल्यास बदनामी होईल, या भीतीने पीडित मुलीच्या आईने आपल्या मुलीचा गर्भपात करण्यासाठी गत रविवारी पुणे येथून नेरूळ गाठले. त्यानंतर आईने पीडित मुलीला नेरूळ येथील महापालिकेच्या मीनाताई ठाकरे रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी केलेल्या तपासणीत पीडित तरुणी चार महिन्यांची गरोदर असल्याचे आढळून आले. याबाबतची माहिती नेरूळ पोलिसांना दिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.
चव्हाण याच्या विरोधात बलात्कारासह पोक्सो कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच सदरचा गुन्हा पुढील तपासासाठी म्हाळुंगे पोलिसांकडे वर्ग केला आहे.