

पुणे / कराड : महाराष्ट्र विधान परिषदेच्या पुणे विभाग पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी शुक्रवार, २३ ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे. सकाळी ८ ते दुपारी ४ या वेळेत मतदान प्रक्रिया पार पडणार असून, मतदान सुरळीत, शांततेत आणि पारदर्शक वातावरणात पार पाडण्यासाठी प्रशासनाकडून आवश्यक तयारी पूर्ण करण्यात आली आहे. पुणे जिल्ह्यात दोन्ही मतदारसंघांसाठी एकूण २३२ मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत. दरम्यान, सातारा जिल्ह्यात शिक्षक मतदारसंघासाठी ४४, तर पदवीधर मतदारसंघासाठी १३ अशी एकूण ५७ मतदान केंद्रे उभारण्यात आली आहेत.
मतदान साहित्याचे वितरण, मतदानानंतर साहित्य सुरक्षितपणे जमा करणे आणि त्याची साठवणूक यासाठीही व्यवस्था करण्यात आली आहे. मतदान प्रक्रिया शांततेत आणि निष्पक्षपणे पार पाडण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी संतोष पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. पुणे जिल्ह्यात पदवीधर मतदारसंघासाठी ८८ हजार २०२, तर शिक्षक मतदारसंघासाठी १६ हजार ८८२ मतदार नोंदणीकृत आहेत. दोन्ही मतदारसंघांतील एकूण १ लाख ५ हजार ८४ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. पदवीधर मतदारसंघासाठी १६०, तर शिक्षक मतदारसंघासाठी ७२ मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत. पदवीधर मतदारसंघात ४७, तर शिक्षक मतदारसंघात ३० उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.
सातारा जिल्ह्यात निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासनाने आवश्यक नियोजन केले आहे. शिक्षक मतदारसंघासाठी २३०, तर पदवीधर मतदारसंघासाठी ४६५ अधिकारी व कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मतदानाची कार्यपद्धती, मतदारांची ओळख तपासणी तसेच निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांबाबत प्रशिक्षण देण्यात आले आहे.
पुणे जिल्ह्यात केंद्रनिहाय व्यवस्था
पुणे शहरासह पुरंदर, हवेली, मावळ-मुळशी, भोर-वेल्हा, दौंड, जुन्नर, खेड आणि बारामती-इंदापूर या तालुका क्षेत्रांसाठी मतदान साहित्य वितरण केंद्रे, साहित्य स्वीकृती केंद्रे आणि स्ट्राँगरूम निश्चित करण्यात आले आहेत. पुरंदरसाठी नवीन प्रशासकीय इमारत, पारगाव रोड; हवेलीसाठी सिंहगड कॉलेज, आंबेगाव; पुणे शहरासाठी श्री गणेश कला क्रीडा रंगमंच, स्वारगेट; भोर-वेल्ह्यासाठी तहसील कार्यालयातील पुरवठा शाखा; दौंड व जुन्नरसाठी संबंधित तहसील कार्यालये; खेडसाठी तहसील कार्यालय, तर बारामती-इंदापूरसाठी अभियांत्रिकी भवन, बारामती येथे व्यवस्था करण्यात आली आहे. मावळ-मुळशीसाठी संबंधित तहसील कार्यालयांमध्ये नियोजन करण्यात आले आहे.
२७ ऑक्टोबरला मतमोजणी
निवडणूक कार्यक्रमानुसार, शुक्रवार, २३ ऑक्टोबर रोजी मतदान होणार असून, मंगळवार, २७ ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. मतदानानंतर मतपेट्या व निवडणूक साहित्य सुरक्षितपणे जमा करण्यासाठी प्रशासनाने व्यवस्था केली आहे. संपूर्ण निवडणूक प्रक्रिया निष्पक्ष, पारदर्शक आणि शांततेत पार पाडण्यासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे.
मतदारांना नाव तपासण्याचे आवाहन
शिक्षक आणि पदवीधर मतदारांनी मतदार यादीतील आपले नाव तसेच मतदान केंद्राची माहिती आधीच तपासून घ्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. मतदारांना [मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर (https://mahaelection.gov.in/Citizen/Search) आपले नाव शोधता येणार आहे. सर्व पात्र मतदारांनी निर्धारित वेळेत मतदान केंद्रावर उपस्थित राहून मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.