

पुणे : पुण्यातील शिवाजीनगर येथील भूजल सर्वेक्षण विभागातील दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांना दोन लाख रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले आहे. या कारवाईत वरिष्ठ भूवैज्ञानिक (वर्ग १) दिवाकर नामदेव धोटे (५३) आणि कनिष्ठ भूवैज्ञानिक (वर्ग २) प्रियंका संदीपान घुले (३९) या दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे. एका बांधकाम व्यावसायिकाकडून कामाचा अहवाल देण्यासाठी ही लाच मागण्यात आली होती.
या प्रकरणातील तक्रारदार हे व्यवसायाने पूर्णत्वाचा बांधकाम व्यावसायिक आहेत. त्यांच्या एका इमारतीच्या बांधकामाचा दाखला मिळवण्यासाठी त्यांनी पीएमआरडीएकडे अर्ज केला होता. पीएमआरडीएने त्यांना भूजल सर्वेक्षण अहवाल सादर करण्यास सांगितले होते. हा अहवाल मिळवण्यासाठी तक्रारदारांनी शिवाजीनगर येथील
भूजल सर्वेक्षण विभागाच्या कार्यालयात धाव घेतली. तेथे कनिष्ठ भूवैज्ञानिक प्रियंका घुले यांनी हा अहवाल देण्यासाठी वरिष्ठ भूवैज्ञानिक दिवाकर घोटे यांच्यावतीने आणि स्वतःसाठी अडीच लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली.
लाचेच्या या मागणीबाबत तक्रारदाराने २२ एप्रिल २०२६ रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, पुणे यांच्याकडे तक्रार नोंदवली होती. एसीबीने या तक्रारीची गांभीर्याने दखल घेत पडताळणी केली असता, प्रियंका घुले यांनी वरिष्ठ अधिकारी धोटे यांच्याशी चर्चा करून लाचेची रक्कम दोन लाख रुपयांवर निश्चित केल्याचे समोर आले.
या तडजोडीनंतर आज, २४ एप्रिल २०२६ रोजी एसीबीच्या पथकाने शिवाजीनगर येथील भूजल सर्वेक्षण कार्यालयात सापळा रचला. प्रियंका घुले यांनी तक्रारदाराकडून दोन लाख रुपयांची लाचेची रक्कम स्वीकारताच त्यांना रंगेहात पकडण्यात आले. याचवेळी वरिष्ठ भूवैज्ञानिक दिवाकर धोटे यांनाही त्यांच्या कार्यालयातून ताब्यात घेण्यात आले आहे.
या दोन्ही आरोपी लोकसेवकांविरुद्ध शिवाजीनगर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा १९८८ च्या कलम ७ आणि १२ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, पुणे परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अपर पोलीस अधीक्षक अजित पाटील आणि अपर पोलीस अधीक्षक अर्जुन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक खंडेराव रंजवे आणि त्यांच्या पथकाने केली आहे.